छत्तीसगडमधील आयईडी ब्लास्टनंतर दिली प्रतिक्रिया
नवी दिल्ली, 06 जानेवारी (हिं.स.) : भारतातून मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करून असा पुनरूच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडात सोमवारी झालेल्या आयईडी ब्लास्टमध्ये 8 जवान आणि एक वाहन चालक असा 9 जणांचा बळी गेला. या घटनेवर शाह यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली आहे.
नक्षलवाद्यांच्या विरोधात संयुक्त मोहिम राबवून परतताना दंतेवाडामध्ये नक्षल्यांनी घातपात घडवला. स्थानिक कुत्रु-बेद्रे रस्त्यावर नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले. हा भ्याड हल्ला आज दुपारी 2,15 वाजता झाला. यामध्ये दंतेवाडा डीआरजीचे 8 जवान आणि एक ड्रायव्हर यांना वीर मरण आले. या घटनेसंदर्भात ट्विटरवर (एक्स) प्रतिक्रिया देताना शाह म्हणाले की, छत्तीसगडमधील बिजापूर येथे झालेल्या आयईडी स्फोटात डीआरजी जवानांच्या मृत्यूच्या वृत्ताने मला अत्यंत दु:ख झाले आहे. मी शूर जवानांच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. हे दु:ख शब्दात मांडणे अशक्य आहे. पण आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही याची मी खात्री देतो, असेही गृहमंत्री शाह यांनी म्हटले आहे. तसेच मार्च 2026 पर्यंत आम्ही भारतीय भूमीतून नक्षलवाद संपवू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी