व्हिडीओ पुढे आल्यानंतर वन विभागाने केली कारवाई
हायकोर्टाने स्वतःहून दाखल करून घेतली ‘पीआयएल’
नागपूर,06 जानेवारी (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांनी वाघीण आणि तिच्या शावकांचा दोन्ही बाजुंनी मार्ग रोखल्याची घटना घडली होती. गेल्या 31 डिसेंबर 2024 रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित पर्यटकांवर बंदी घातली आणि जिप्सी चालक आणि फॉरेस्ट गाईडला 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प उपसंचालक प्रभूनाथ शुक्ला यांनी यासंदर्भात माहिती दिली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेण्याचे आदेश दिले. यासह न्यायालयाने राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना बुधवारपर्यंत याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी सांगितले आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी जबाब नोंदविल्यावर बुधवारी याप्रकरणी न्यायालयात सुनावणी होणार आहे. येत्या बुधवारी न्यायालयाकडून याबाबत न्यायालयीन मित्राची नियुक्ती केली जाईल आणि पुढील सुनावणी होईल. दरम्यान वन विभागाने सदर घटनेतील जिप्सी चालकांना 25 हजार आणि फॉरेस्ट गाईडला एक हजाराचा दंड ठोठावला असून गैरप्रकारात सहभागी असलेल्या पर्यटकांना कायमची बंदी घालण्यात आल्याचे शुक्ल यांनी सांगितले. वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 च्या संबंधित कलमांतर्गत सर्व संबंधित व्यक्तींविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहे. या गैरप्रकारात सहभागी असलेल्या पर्यटकांना अभयारण्यात भविष्यात येण्यापासून कायमची बंदी घालण्यात आली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजन सुचवण्यासाठी उपसंचालक, बोर व्याघ्र प्रकल्प, वर्धा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.सफारी वाहनांच्या गर्दीला तोंड देण्यासाठी सफारी दरम्यान पर्यटक, निसर्ग मार्गदर्शक आणि जिप्सी चालकांना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अशा घटना टाळण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सफारी मार्गांवर नियमित गस्त वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. पर्यावरणीय पर्यटन आणि वन्यजीव संवर्धनाबाबत जागरूकता आणि संवेदनशीलता वाढवण्यासाठी निसर्ग मार्गदर्शक आणि जिप्सी चालकांसाठी विशेष बैठका आणि कार्यशाळा आयोजित केल्या जात असल्याचे शुक्ला यांनी सांगितले.
-----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी