नाशिक, 4 जानेवारी (हिं.स.)।
एव्हरशाईन स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या वतीने व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन (एनडीसीए) यांच्या सहकार्याने इन्व्हिटेशनल प्रोफेशनल्स लिग २०२५ आयोजित केली आहे. या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन शनिवारी (४ जानेवारी २०२४) सकाळी महात्मानगर मैदानावर झाले. स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून, त्यांच्यात लढतीला सुरुवात झाली आहे.
इन्व्हिटेशनल प्रोफेशनल्स लिगच्या उद्घाटन कार्यक्रमाला मराठा विद्वा प्रसारक संस्था, नाशिकचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे यांच्यासमवेत एव्हरशाईन स्पोर्ट्स ॲकॅडमीचे अध्यक्ष डॉ.अनिरुद्ध भांडारकर, सचिव तुषार चव्हाण, उपाध्यक्ष संजय कलंत्री, खजिनदार महेश उपाध्ये, समिती सदस्य डॉ.दिनेश ठाकूर आदी सदस्य उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ॲड.नितीन ठाकरे म्हणाले, खेळाला प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असून, सुदृढ आरोग्यासाठी देखील ते महत्त्वाचे आहे. ऐरवी कामात व्यस्त असलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यातील क्रीडागुण दाखविण्याची संधी मिळेल, असे सांगत त्यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
यानंतर विनो शाह यांनीदेखील स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. अशा स्वरुपाच्या स्पर्धांची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
उद्घाटनानंतर झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये नाशिक स्ट्रायकर्सने लिओ किंग्स सीए या संघाचा ९७ धावांनी दणदणीत पराभव केला. लिओ किंग संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. नाशिक स्ट्रायकर्स संघाने १०० चेंडूंच्या सामन्यात ३ बाद १८५ धावा केल्या. संघाकडून डॉ.राहुल पाटील यांनी ४७ चेंडूंमध्ये ९१ धावांची धुव्वादार खेळी केली. तर डॉ.आशिष पुरी यांनी ३४, डॉ.स्वप्नील कर्पे यांनी ३१ धावांचे योगदान दिले. उत्तरादाखल लिओ किंग्स सीए संघाचे फलंदाज फार कमाल करु शकले नाही. व ९ बाद ८८ धावा त्यांना करता आल्या. कर्णधार मनोज तांबे यांनी २६, राजेश कोकणे यांनी २२ धावा केल्या. नाशिक स्ट्रायकर्सच्या डॉ.स्वप्नील मराठे यांनी ४ गडी बाद केले. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना सामनावीरच्या पारितोषिकाने गौरविण्यात आले.
दुसर्या सामन्यात एससीबी संघाने एव्हरशाईन ब्लास्टर्स संघाचा ५ गडी राखून पराभव केला. एससीबीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. एव्हरशाईन ब्लास्टर्स संघाने सर्वबाद ११० धावा केल्या. संघाकडून कुणाल कातकाडे यांनी ४९ धावांचे योगदान दिले. एससीबी संघाने आक्रामकपणे खेळाचे प्रदर्शन करतांना ८६ चेंडूत ५ बाद ११६ धावा करतांना सामना जिंकला. विजयी संघाकडून चेतन बिरारीस २६, गौरव बुर्हाडे २१ धावांचे योगदान दिले.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI