अहिल्यानगर, 6 जानेवारी (हिं.स.):- विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाबरोबर संशोधन वृत्ती वाढीस लागावी याकरता झालेल्या तंत्र प्रदर्शनात अमृतवाहिनी आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रोजेक्टला द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला असल्याची माहिती प्राचार्य विलास भाटे यांनी दिली आहे.
अमृतवाहिनी आयटीआय व लोकशाहीर विठ्ठल उमप शासकीय आयटीआय गुंजाळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या तांत्रिक प्रदर्शनाचे उद्घाटन अमृतवाहिनी संस्थेचे अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे.बी.गुरव यांनी केले.
या वेळी प्राचार्य विलास भाटे,साकुर आयटीआयचे प्राचार्य नामदेव गायकवाड,प्रा.यू.व्ही.कुटे.व्ही.एस गडाख आदी उपस्थित होते.या तांत्रिक प्रदर्शनात आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रोजेक्ट सादर केले होते.यामध्ये तळेगाव दिघे येथील इलेक्ट्रिकल विभागाने स्मार्ट रेल्वे अँड इलेक्ट्रिकल फॉल्ट डिटेक्टर या प्रोजेक्टसाठी द्वितीय क्रमांक मिळवला.यामध्ये शेळके गुरुदेव व काशीद विजय या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.त्यांना बाबासाहेब जोंधळे व आर.डी मांडे यांनी मार्गदर्शन केले.
अमृतवाहिनी आयटीआय मधील इलेक्ट्रिशियन विभागाने बॉर्डर सिक्युरिटी सिस्टीम या प्रोजेक्टसाठी तृतीय क्रमांक मिळवला.यासाठी वेदांत शेळके व गौरव आव्हाड यांनी सहभाग घेतला.संजय कुटे व संपत हिरे यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बोलताना डॉ.गुरव म्हणाले की माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृतवाहिनी संस्थेने परिपूर्ण गुणवत्तेचे शिक्षण दिले आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी यासाठी हे तंत्र प्रदर्शन नक्कीच उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले.प्राचार्य विलास भाटे म्हणाले की ग्रामीण भागात असूनही अमृतवाहिनी आयटीआयने विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्याशी समन्वय ठेवला असून त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना थेट चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत.सध्या श्रमाला जास्त महत्त्व असून आयटीआयच्या विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात मोठी मागणी आहे.अशा तंत्र प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढण्यास मोठी मदत होईल असेही ते म्हणाले.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni