अहिल्यानगर, 6 जानेवारी (हिं.स.):- दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया),अहमदनगर स्थानिक केंद्राच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध व्हॅल्युअर व चार्टर्ड इंजिनिअर,सल्लागार अभियंता भारतभूषण भागवत यांची तर मानद सचिव पदी प्रा.डॉ. दीपक विधाते यांची निवड झाली आहे.ही निवड २०२४ ते २०२६ या कालावधीसाठी असून संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उभयंतांनी पदाची सूत्रे स्वीकारली.
दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) या केंद्रीय संस्थेची देश व विदेशामध्ये १२५ हून अधिक केंद्रे आहेत. चर्चासत्रे,व्याख्याने,कार्यशाळा,औद्योगिक भेटी अशा उपक्रमांद्वारे वेगवेगळ्या शाखांमधील अभियंत्यांचे तांत्रिक ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी संस्था प्रयत्नशील असते व अभियांत्रिकी क्षेत्रात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासनाला सहकार्य व मार्गदर्शन करते.संस्थेच्या अहमदनगर केंद्रामध्ये ११०० कार्पोरेट व २३०० हून अधिक विद्यार्थी सभासद आहेत.संस्थेद्वारे अभियांत्रिकी विद्यार्थी व सभासदांसाठी विविध उपक्रम राबवले जातात.नगर-कल्याण रोडवर संस्थेच्या इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे.केंद्र शासनाच्या प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी संस्थेला शासनाकडून परवानगी मिळाली आहे.कौशल्य विकास केंद्र पूर्ण क्षमतेने चालवणे व इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे यासाठी आपले प्राधान्य असून काम पूर्ण होण्यासाठी सभासदांनी आर्थिक हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले.वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचे मावळते अध्यक्ष मनोहर अणेकर यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा सादर केला.अत्यंत कठीण परिस्थितीतही सर्वांच्या सहकार्याने संस्थेच्या इमारतीचे बांधकाम,प्रायोजित बक्षीस योजना व कौशल्य विकास केंद्र इ योजना कार्यान्वित केल्याचे तसेच आर्थिक दृष्ट्या संस्था सक्षम करण्याचे प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले.मावळते मानद सचिव अभय राजे यांनीही मनोगत व्यक्त केले.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni