मुंबई , 6 जानेवारी (हिं.स.)।चीनमधून कोरोना व्हायरसचा प्रसार संपूर्ण जगभरात झाला होता.त्यांनतर चीनमध्ये आता नव्या व्हायरसनं डोकं वर काढलं आहे. HMPV या नव्या व्हायरसनं चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे. या आजाराची साथ चीनमध्ये पसरल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देश अलर्ट मोडवर आहेत. या HMPV व्हायरसमुळे आता महाराष्ट्रातील आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत. सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. स्वच्छतेची नियमावली पाळण्याच्याही सूचना महाराष्ट्र सरकारने दिल्या आहेत.
आयोग्य विभागाने नियमावली जाहीर केल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीत HMPV विषाणूबाबत आणि त्याच्या तीव्रतेबाबत चर्चा होणार आहे. सर्वसामान्यांमध्ये कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी नेमक्या कोणत्या बाबी अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे याबाबत चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.एचएमपीव्ही या व्हायरसच्या चीन देशातील उद्रेकानंतर खबरदारीचा उपाय म्हणून राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच आरोग्य मंडळातील उपसंचालकांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच, घाबरण्याची गरज नाही त्यामुळे भिती पसरवू नका, असा सल्लाही आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच, ही मार्गदर्शक तत्त्व फक्त आणि फक्त दक्षता बाळगण्यासाठी असल्याचंही सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करुन सर्दी-खोकला अर्थात आयएलआय/सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात यावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) हा एक व्हायरस आहे, ज्याची लक्षणं सामान्य सर्दीच्या लक्षणांसारखीच असतात. एचएमपीव्हीच्या संसर्गात सर्दी आणि कोरोना आजारासारखी लक्षणे दिसतात. खोकला, ताप येतो, सर्दी होते. ह्यूमन मेटाप्रोन्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा मेटाप्रोन्युमोव्हायरस जीन्सचा आरएनए विषाणू आहे. त्याच्या बाधेमुळे लहान मुले आणि वृद्ध यांना सर्वांत जास्त त्रास होतो. या आजारांमुळे चिनी अधिकाऱ्यांनी लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यास, मास्क घालण्यास व हात सॅनिटाईझ करण्यास सांगितले आहे. एचएमपीव्ही विषाणूमुळे झालेला संसर्ग बरा करण्यासाठी सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash