पुणे, 6 जानेवारी (हिं.स.)।
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा १५ ते १९ जानेवारी दरम्यान बारामती येथे होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली.
या स्पर्धेसाठी राज्य शासनाचे ७५ लाखांचे अनुदान मिळणार असून, उर्वरित सव्वा कोटी रुपयांचा निधी लोकसहभागातून उभा करणार आहे. या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही त्यांनी नमूद केले. या काळात बारामतीत क्रीडामय वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी याप्रसंगी प्रशासन व कार्यकर्त्यांना दिल्या. बारामतीच्या रेल्वे ग्राउंडवर चार मैदाने तयार करण्यात येणार असून, प्रेक्षकांना या कबड्डी सामन्यांचा आनंद घेण्यासाठी मजबूत तात्पुरती गॅलरीही उभारली जाणार आहे.
रविवारी शासनाच्या क्रीडा विभागाच्यावतीने उपमुख्यमंत्र्यांसमोर या स्पर्धेच्या अनुषंगाने सादरीकरण केले गेले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, बारामती बँकचे अध्यक्ष सचिन सातव, पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे सदस्य सतपाल गावडे, कबड्डी मार्गदर्शक दादा आव्हाड आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु