मुंबई , 7 जानेवारी (हिं.स.)।यशस्वी जयस्वालने 2024 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी जोरदार कामगिरी केली.त्यांनतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही यशस्वी जयस्वालने आपल्या फलंदाजीचे पराक्रम दाखवले. पण तरीही टीम इंडियाला मालिका 3-1 ने गमवावी लागली. सिडनीत झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. यावर आता यशस्वी जयस्वालने इंस्टाग्रामवर ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
यशस्वी जयस्वालने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, 'मी ऑस्ट्रेलियात खूप काही शिकलो. दुर्दैवाने, निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे झाला नाही. पण आम्ही आणखी मजबूत कमबॅक करु, तुमचा आधार सर्वस्व आहे'. रविवारी सिडनीतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत सहा विकेट्सने पराभूत झाल्यानंतर दशकात प्रथमच भारताला बीजीटी ट्रॉफी राखण्यात अपयश आले.जयस्वालने पहिल्या कसोटीत 161 धावांची खेळी करत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सध्याच्या बीजीटी मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू होता. त्याने एकूण 391 धावा केल्या. पण तरीही टीम इंडियाला मालिका 3-1 ने गमवावी लागली. या पराभवामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या भारताच्या आशाही आता संपल्या आहेत. आता अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
यशस्वी जयस्वालने 2024 मध्ये टीम इंडियासाठी 15 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 1478 धावा केल्या. ज्यात तीन शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. 2024 मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा तो भारतीय फलंदाज होता. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केली आणि दोन द्विशतके झळकावली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत भारताच्या पराभवाने चाहत्यांची निराशा झाली आहे पण अनुभवी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी जयस्वाल आणि नितीश कुमार रेड्डी यांसारख्या युवा प्रतिभांना पाठिंबा दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash