अमरावती, 8 जानेवारी (हिं.स.)।
वरुड-मोर्शी मतदारसंघातील विकास प्रकल्पांशी संबंधित प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी आज नागपूर येथे विदर्भ पाठबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात आमदार उमेश यावलकर यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मतदार संघातील पंढरी माध्यम प्रकल्प, पाक नदी प्रकल्प,चांदस-वाठोडा प्रकल्प व चारगड प्रकल्प या महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली. कार्यकारी संचालकांसह संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि प्रकल्प व्यवस्थापन समितीचे सदस्य बैठकीला उपस्थित होते.
बैठकीदरम्यान, या प्रकल्पांशी संबंधित प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध कारणांमुळे रखडलेल्या कामांची पाहणी करून ते काम तातडीने पूर्ण करण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या. प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधण्याचे आदेश दिले.
याशिवाय, नदीजोड प्रकल्पांतर्गत वरुड-मोर्शी मतदारसंघातील महत्त्वाच्या नद्या व नाल्यांचा समावेश करण्यासाठी सखोल अभ्यास करण्याचे निर्देशही देण्यात आले. यामध्ये पाणीपुरवठ्याचे नियोजन, जलसंधारण, व जलउपयोग योजनांवर भर दिला जाणार आहे. या प्रकल्पांमुळे मतदारसंघातील शेतीला फायदा होईल तसेच स्थानिक रहिवाशांची पाणीटंचाईची समस्या दूर होईल.
बैठकीत पंढरी माध्यम प्रकल्प, पाक नदी प्रकल्प, आणि चांदस-वाठोडा प्रकल्प यांचे अंमलबजावणी वेळापत्रक तयार करण्यात आले. काम वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रकल्पांवर नेमलेल्या कंत्राटदारांना नियमितपणे प्रगती अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. याशिवाय, निधी वितरण, कामाच्या गुणवत्ता तपासणी आणि प्रकल्प पूर्णतेसाठी आवश्यक साधनसामग्रीची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे आदेशही देण्यात आले. प्रकल्पांमुळे वरुड-मोर्शी मतदारसंघातील स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. बैठकीत प्रकल्पांच्या प्रगतीबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच रखडलेल्या कामांवर उपाय शोधण्यासाठी प्रत्येक विभागाला सहकार्य करण्याची विनंती करण्यात केली.
वरुड-मोर्शी मतदारसंघातील विकासकामे व प्रलंबीत प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर सातत्याने प्रयत्न सुरु केले आहेत. यासोबतच वरुड मोर्शी तालुका कशापध्दतीने सुजलाम सुफलाम करता येईल याकडे प्राधान्यक्रमाने कामकाज सुरु केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी