अकोला, 8 जानेवारी, (हिं.स.) - सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (इज ऑफ लिव्हिंग) यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. हा कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून कार्यालयांच्या सौंदर्यीकरणाबरोबरच नागरिकांना जलद, पारदर्शी सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे दिले.
राज्यातील प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या असून, त्या अनुषंगाने जिल्ह्यातील अधिका-यांची बैठक जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली. जिल्हा परिषदेच्या सीईओ बी. वैष्णवी, उपवनसंरक्षक डॉ. कुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री, कुंभार म्हणाले की, कार्यालयाचे संकेतस्थळ अद्ययावतीकरण, इज ऑफ लिव्हिंग, स्वच्छता, प्रलंबित प्रकरण, तक्रार निवारण प्रणाली,आवश्यक सुविधा, अभ्यागतांना आवश्यक सोयी-सुविधा, माहिती सहज मिळण्याची सोय आदी बाबींद्वारे नागरिकांना प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सातकलमी कार्यक्रमाद्वारे निश्चित करण्यात आले आहे.
त्यानुसार प्रत्येक कार्यालयाने कार्यवाही करावी. आपल्या कार्यालयातील आवश्यक बाबी, सुधारणांची गरज लक्षात घेऊन त्यानुसार नियोजन व कार्यवाही करावी. जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक कार्यालयाचे त्रयस्थामार्फत मूल्यांकन करण्यात येणार आहे. येत्या 100 दिवसांत दृश्य परिणाम दिसतील अशा पद्धतीने कार्यालयात व कार्यालयीन कामकाजात विधायक बदल घडवून आणावेत. नागरिकांना सहजसुलभ सेवा मिळाव्यात, तक्रारींचे लगेच निवारण व्हावे अशा पद्धतीने कायमस्वरूपी कार्यप्रणाली निर्माण करण्याचे आदेश त्यांनी दिले.
पेपरलेस कार्यालय
कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करा, सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करा. कार्यालयांची स्वच्छता करा, अनावश्यक कागदपत्रे काढून टाका, खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करावीत.
कागदाचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी डिजीटल कॉपी ठेवाव्यात. शक्य तिथे प्लास्टिकचा वापर टाळण्याकडे कल हवा. पर्यावरणपूरक वातावरणनिर्मीतीसाठी प्रयत्न व्हावेत. यादृष्टीने उपक्रम हाती घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे