२७ व्या बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचा शुभारंभ
सांगलीच्या देहभान नाटकाने महोत्सवाची सुरुवात
सिंधुदुर्ग, 8 जानेवारी (हिं.स.)। : कुडाळला खूप मोठी नाट्यपरंपरा आहे. रंगभूषाकार बाबा वर्दम हे कुडाळचे भूषण आहेत. त्यांना सिने नाट्य क्षेत्रात एक मोठे वलय आहे. त्यांच्या नावाने गेली पन्नास वर्ष हि संस्था आणि गेली २७ वर्षे हा नाट्य महोत्सव सुरु आहे, ही कौतुकाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते प्रसाद पंडित यांनी केले. कुडाळच्या बाबा वर्दम थियेटर्सने आयोजित केलेल्या २७ व्या कै बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी श्री. पंडित बोलत होते.
बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ आयोजित कै बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाला मंगळवारी सायंकाळी सुरुवात झाली. ७ जानेवारी हा बाबा वर्दम यांचा जन्मदिन. त्याचे औचित्य साधून दरवर्षी ७ ते १३ जानेवारी या काळात कुडाळ हायस्कुलच्या बाबा वर्दम रंगमंचावर या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाचे हे या महोत्सवाचे २७ वे वर्ष आहे. या महोत्सवाचे उदघाटन अभिनेते प्रसाद पंडित आणि उपास्थीत मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि नटराज पूजन तसेच बाबा वर्दम यायच्या स्मृतीस वंदन करून करण्यात आले. त्याच बरोबर मान्यवरांच्या हस्ते रंगमंच पूजन देखील करण्यात आले. यावेळी बाबा वर्दम थियेटर्सच्या अध्यक्षा वर्षा वैद्य, कामशिप्र मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, सारस्वत बँकेचे संचालक सुनील सौदागर, पुण्याचे रवींद्र देशपांडे, ज्येष्ठ दिग्दर्शक चंदू शिरसाट व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रसाद पंडित यांनी चंदू शिरसाट यांचा आपण मोठा फॅन असल्याचे सांगून त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'अथ मानूस जगन ह' या नाटकाची आठवण काढली. ते नाटक आणि चंदू शिरसाट यांचे दिग्दर्शन आपण विसरू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बाबा वर्दम याच्या बद्दल देखील प्रत्येक कलाकारांच्या मनात नितांत आदर असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही कलेचा आनंद कलाकार स्वतः घेत नाही तो पर्यंत ती कला रसिकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे नाट्यकलेचा आनंद घेऊन नाटक करा मग ते नाटक रसिकांपर्यंत नक्की पोहोचेल, असे आवाहन त्यानी कलाकारांना केले.
बाबा वर्दम थियेटर्सचे कार्यवाह केदार सामंत यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेची वाटचाल अधोरेखित केली. मान्यवर पाहुण्यांचे स्वागत निलेश जोशी यांनी तर सूत्रसंचालन आणि आभारपदर्शन शमा वैद्य यांनी केले. उदघाट्न सोहळ्यानंतर अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती, सांगली.यांचे देहभान हे नाटक सादर झाले. त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
---------------
हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी