महाकुंभ यात्रेकरूंना समृद्ध अनुभव देणारा ठरावा यासाठी आयुष मंत्रालय सज्ज - प्रतापराव जाधव
महाकुंभ 2025 मधील आयुष मंत्रालयाच्या उपक्रमांचा घेतला आढावा, महाकुंभातील प्रमुख आयुष सुविधांबद्दल दिली माहिती नवी दिल्ली, ९ जानेवारी (हिं.स.) : प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून सुरु होत असलेल्या ऐतिहासिक महाकुंभ 2025 च्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आयुष
प्रयागराज कुंभमेळा


महाकुंभ 2025 मधील आयुष मंत्रालयाच्या उपक्रमांचा घेतला आढावा, महाकुंभातील प्रमुख आयुष सुविधांबद्दल दिली माहिती

नवी दिल्ली, ९ जानेवारी (हिं.स.) : प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून सुरु होत असलेल्या ऐतिहासिक महाकुंभ 2025 च्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी महाकुंभमध्ये आयुष मंत्रालयाने आयोजित केलेल्या उपक्रमांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्यापक आढावा बैठक घेतली. मंत्रालयाच्या सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या भाविकांना समृद्ध अनुभव देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या चमूचे अभिनंदन केले.

तयारीचा आढावा घेताना ते म्हणाले, “महाकुंभ हा केवळ लाखो भाविकांचा मेळावा नसून, अध्यात्म, संस्कृती आणि आरोग्याचा पवित्र संगम आहे. या ऐतिहासिक घटनेचा भाग बनताना त्याच्या जागतिक महत्वाची आपल्याला जाणीव होते. हा कार्यक्रम म्हणजे आरोग्य सेवेतील पारंपरिक आयुष प्रणालीचे महत्व प्रदर्शित करण्याची संधी आहे, आणि भाविकांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी या उपचार पद्धतींचा दैनंदिन जीवनात समावेश करायची संधी मिळणे, हे आपले भाग्य आहे.”

आयुषच्या महत्त्वाच्या व्यवस्थांवर प्रकाश टाकताना ते म्हणाले, “महाकुंभ 2025 या ऐतिहासिक मेळाव्यामध्ये सहभागी होणार्‍या भाविकांना समृद्ध अनुभव देण्यासाठी, आयुष मंत्रालयाने राज्य सरकारच्या सहकार्याने अथक प्रयत्न केले आहेत. यंदाचा महाकुंभ एक अविस्मरणीय अनुभव ठरावा, यासाठी मेळाव्याच्या स्थळी आरोग्य सेवांसह इतर कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन केल्याबद्दल मी आयुष टीमचे अभिनंदन करतो.”

महाकुंभ 2025 मध्ये भाविकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती देताना आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा म्हणाले, आयुष मल्टी ओपीडी क्लिनिक, फिरते आरोग्य केंद्र, आयुष औषधांचे मोफत वाटप, आणि सर्व अभ्यागतांसाठी महाकुंभात योग शिबिरे, यासारख्या 24/7 सेवा आम्ही उपलब्ध केल्या आहेत. जनजागृतीसाठी सोशल मीडियासह इतर लोकप्रिय माध्यमांद्वारे या सुविधांची माहिती दिली जात आहे.”

या जागतिक मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या लाखो यात्रेकरूंना आरोग्य आणि निरामयतेचा अनुभव देण्यासाठी आयुष प्रणालींनी सुसज्ज असलेला, महाकुंभ 2025 हा ऐतिहासिक कार्यक्रम ठरेल, अशी अपेक्षा आहे. बैठकीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी महाकुंभ 2025 मध्ये आयोजित केलेल्या पुढील प्रमुख आयुष उपक्रमांची माहिती दिली:

24 तास आयुष मल्टी ओपीडी क्लिनिक: यात्रेकरूंना वैयक्तिक आरोग्य सेवा 24 तास उपलब्ध असतील, ज्यात विविध आयुष प्रणालींच्या नैसर्गिक आणि सर्वसमावेशक पद्धतींचा समावेश असलेली सल्लामसलत आणि उपचार याचा समावेश असेल. हे क्लिनिक सर्व अभ्यागतांना अखंड आरोग्य सेवा सुनिश्चित करतील.

विशेष योग शिबिरे : मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था (एमडीएनआयवाय) आणि राज्य सरकारच्या तज्ज्ञांच्या नेतृत्वाखालील या शिबिरांमध्ये मानसिक संतुलन, मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यावर भर दिला जाईल.

कुंभमेळ्यातील आध्यात्मिक वातावरणाबरोबरच ही सत्रे आरोग्य आणि अध्यात्म यांचा परिपूर्ण मिलाफ साधतील.

औषधी वनस्पती प्रदर्शन: या माहितीपूर्ण प्रदर्शनात भारताच्या समृद्ध औषधी वनस्पतींचे उपचारात्मक गुणधर्म प्रदर्शित केले जातील. अभ्यागतांना नैसर्गिक उपचारांचे सामर्थ्य आणि आधुनिक आरोग्य सेवा पद्धतींमधील त्याची समर्पकता जाणून घेण्याची संधी मिळेल.

फिरते आयुष क्लिनिक : राज्य आयुष सोसायटीतर्फे कुंभमेळ्यात सुसज्ज फिरते आरोग्य केंद्र तैनात करण्यात येईल, जे संपूर्ण कार्यक्रमा दरम्यान, यात्रेकरूंना वेळेवर आरोग्य विषयक साहाय्य देईल, तसेच आयुष-आधारित आरोग्य सेवा त्वरित उपलब्ध करून देईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande