नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर (हिं.स.) भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव पाच बाद ५१८ धावांवर घोषित केला. खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने चार बाद १४० धावा केल्या होत्या आणि भारतापेक्षा ३७८ धावांनी पिछाडीवर होता. खेळ संपला तेव्हा शाई होप ३१ आणि टेविन इमलाच १४ धावांवर नाबाद होते. भारताकडून रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी केली आणि आतापर्यंत तीन विकेट्स घेतल्या आहेत. तर कुलदीप यादवने एक विकेट घेतली.
डाव घोषित केल्यानंतर भारताने वेस्ट इंडिजला सुरुवातीचा धक्का दिला. जॉन कॅम्पबेल १० धावांवर बाद झाला. त्यानंतर तेजनारायण चंद्रपॉल आणि अॅलिक अथानाझे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६६ धावा जोडून संघाचा डाव सावरला. पण जडेजाने ३४ धावांवर चंद्रपॉलला बाद केले. त्यानंतर कुलदीपने अथानाझेला बाद करत वेस्ट इंडिजला तिसरी विकेट मिळवून दिली. अथानाझे ४१ धावांवर बाद झाला. त्यानंतर जडेजाने कर्णधार रोस्टन चेसला एकही धाव न देता बाद केले. भारत आता वेस्ट इंडिजचा डाव लवकर संपुष्टात आणण्यावर आणि तिसऱ्या दिवशी लक्षणीय आघाडी मिळविण्यावर लक्ष केंद्रित करेल.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने पाच बाद ५१८ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि यशस्वी जयस्वालनंतर कर्णधार शुभमन गिलनेही शतक झळकावले. गिल १२९ धावांवर नाबाद राहिला. ध्रुव जुरेलच्या रूपात भारताने पाचवी विकेट गमावताच संघाने डाव घोषित केला. भारताकडून यशस्वीने सर्वाधिक १७५ धावा केल्या.
भारताने दुसऱ्या दिवशी २ बाद ३१८ धावांवर खेळ सुरू केला. पण यशस्वी आणि गिलमधील समन्वयाच्या अभावामुळे जयस्वाल धावबाद झाला आणि त्याचे द्विशतक हुकले. त्यानंतर गिलने नितीश रेड्डीसोबत चौथ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. नितीश ४३ धावांवर बाद झाला आणि अर्धशतक पूर्ण करु शकला नाही. त्यानंतर गिलने गियर बदलले आणि वेगाने खेळण्यास सुरुवात केली. दुसऱ्या सत्रात त्याने त्याचे १० वे कसोटी शतक पूर्ण केले. जुरेल देखील अर्धशतकाच्या जवळ होता पण ४४ धावांवर बाद झाला. वेस्ट इंडिजकडून जोमेल वॉरिकनने तीन, तर रोस्टन चेसने एक विकेट घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे