* आयपीएल खेळाडू राजवर्धन हंगेरीकरला खेळ बघण्याची संधी
नाशिक, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय – तर्फे होणाऱ्या २३ वर्षांखालील सी के नायडू ट्रॉफी सामन्यासाठी यंदादेखील निवड झाली आहे हे सर्वांना माहित आहेच. १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा चार दिवसीय सामना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे होत आहे. या सामन्यासाठी २३ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघ नाशिक मध्ये दाखल झाला असून त्यांनी आज तीन-साडेतीन तास कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर कसून सराव केला.
हा २३ वर्षांखालील महाराष्ट्र संघ नुकत्याच झालेल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन आयोजित बापुना चषक आमंत्रितांच्या स्पर्धेत उपविजेता ठरला आहे. या संघातील पुढील ५ खेळाडूंनी १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यातील चौघांची रणजी स्पर्धेत, तर एकाची आय पी एल च्या दोन संघातही निवड झाली आहे. कर्णधार सचिन धस, दिग्विजय पाटील, अनुराग कवडे व राजवर्धन हंगर्गेकर या चौघांनी १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व, तसेच महाराष्ट्र संघाचे रणजी स्पर्धेत देखील प्रतिनिधित्व केले आहे. तर किरण चोरमाळेने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. राजवर्धन हंगर्गेकर तर आय पी एल मध्ये देखील सी एस के व एल एस जी या संघांचा भाग होता. तसेच २३ वर्षांखालील उदयोन्मुख भारतीय - ईमरजिंग इंडिया - संघांत देखील निवडला गेला होता.
महाराष्ट्र संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे : १- सचिन धस - कर्णधार, २- दिग्विजय पाटील - उपकर्णधार, ३- अनिरुद्ध साबळे,४-नीरज जोशी , ५-अनुराग कवडे - यष्टीरक्षक, ६- किरण चोरमाळे , ७- साहिल औताडे, ८- शुभम मैद, ९- अब्दुस सलाम , १०- राजवर्धन हंगर्गेकर, ११- वैभव दारकुंडे , १२- स्वराज चव्हाण , १३ -अजय बोरुडे , १४- अभिषेक निषाद, १५- हर्ष मोगवीरा, १६- निखिल लुनावत, मुख्य प्रशिक्षक - निरंजन गोडबोले, सहाय्यक प्रशिक्षक - निखिल पराडकर , गोलंदाजी प्रशिक्षक - अनुपम संकलेचा, स्ट्रेंग्थ व कंडीशनींग कोच - विनोद यादव, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक - मोहसिन सय्यद ,स्ट्रेंग्थ व कंडीशनींग कोच - विनोद यादव, फिजियो - संदीप गायकवाड, संघ व्यवस्थापक - मोहम्मद पूनावाला
मागील हंगामात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे २३ वर्षांखालील सी के नायडू ट्रॉफीच्या झालेल्या सामन्यात महाराष्ट्र संघाने केरळ विरुद्ध १ डाव व १४९ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. या वर्षी देखील या संघाकडून तशीच जोरदार कामगिरी होईल अशी सर्व क्रिकेट रसिकांना अपेक्षा आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV