मानवी मूल्यांची जोपासना व्हावी – निवेदिता पवार
कोल्हापूर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।आजच्या स्वार्थी युगातही काही व्यक्ती व स्वयंसेवी संस्था निःस्वार्थ भावनेने मानवी मूल्यांची जोपासना करत समाजकार्य करत आहेत. अशा संस्था व व्यक्ती समाजाच्या उन्नतीसाठी प्रेरणास्थान ठरत असून त्यांचा सन्मान हा केवळ औपचारि
स्वयंसेवी संस्था व त्यांच्या विश्वस्तांचा सन्मान


कोल्हापूर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।आजच्या स्वार्थी युगातही काही व्यक्ती व स्वयंसेवी संस्था निःस्वार्थ भावनेने मानवी मूल्यांची जोपासना करत समाजकार्य करत आहेत. अशा संस्था व व्यक्ती समाजाच्या उन्नतीसाठी प्रेरणास्थान ठरत असून त्यांचा सन्मान हा केवळ औपचारिक नव्हे, तर समाजातील चांगुलपणाचा गौरव आहे, असे प्रतिपादन धर्मदाय सह आयुक्त सौ. निवेदिता पवार यांनी केले.

कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत स्वयंसेवी संस्था व त्यांच्या विश्वस्तांचा सन्मान धर्मदाय सह आयुक्त कार्यालयाच्या वतीने आयोजित समारंभात करण्यात आला.

सौ. पवार पुढे म्हणाल्या, मानवी मूल्यांची अवहेलना होत असताना या संस्थांचे व विश्वस्तांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे. त्यांचे सामाजिक योगदान सर्वदूर पोहोचावे, समाजाने त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, हीच खरी कृतज्ञता ठरेल.

यावेळी विविध स्वयंसेवी संस्थांचा गौरव करण्यात आला, ज्यात मानव सेवा संस्था (सुप्रिया देशपांडे), वी फॉर सोल्जर (डॉ. प्रकाश ओसवाल), यशोदर्शन फाउंडेशन (योगेश अग्रवाल), सार्थ एज्युकेशन सोसायटी (डॉ. दिलीप माळी), स्वामी समर्थ गोसेवा संस्था, वाचन कट्टा सेवा भावी संस्था, विकलांग सेवा केंद्र, कोव्यास डेव्हलपमेंट सेंट्रल सोसायटी, श्रमिक सहयोग, शोषित मुक्ती अभियान संस्था इत्यादींचा समावेश होता. या संस्थांना शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

सौ. पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांचेही कौतुक करत नवनियुक्त सदस्यांचे स्वागत केले व सर्वांना समर्पण, एकता आणि सौहार्द यांसह कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यालयातील अधीक्षक शिवराज नाईकवडे ,अरुण भुईंबर व सचिन पाटील यांना विशेष सेवा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच शालिनी गुल्हाने, मनीषा पाटील, विशाल किल्लेदार, शाहीन आवटी, अनिकेत चौगुले, ऋतुराज गायकवाड, विशाल दळवी, सौरभ ताथवडे व रणजीत नाईकनवरे यांनाही त्यांच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानपत्र देण्यात आले.

सौ. पवार यांनी सर्व न्यास व स्वयंसेवी संस्थांना आवाहन केले की, आपल्या संस्थांचे सर्व नोंदी व हिशोब नियमितपणे अद्ययावत ठेवा, परस्परांतील वाद मैत्रीपूर्ण रीतीने सोडवा आणि जर कार्यालयीन मार्गदर्शन अथवा मदतीची गरज भासल्यास धर्मदाय कार्यालयाशी संपर्क साधा. विश्वस्तांनी धर्मादाय कार्याचा आनंद घ्यावा, कोणत्याही अपेक्षेशिवाय समाजासाठी कार्य करावे. हीच खरी समाजसेवेची भावना आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. विशाल क्षीरसागर यांनी केले. या प्रसंगी सहाय्यक धर्मदाय आयुक्त शरद वाळके, ॲड. डी. एस. पाटील, ॲड. अप्पासाहेब घेरडे तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande