रत्नागिरी, 15 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरी शहराच्या स्वच्छतेला गालबोट लावणाऱ्यांना आता रत्नागिरी नगरपालिकेने धडा शिकवण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध आरोग्य विभागाने धडक मोहीम राबवली असून, आतापर्यंत पाच नागरिकांवर प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या आदेशानुसार आरोग्य निरीक्षक संदेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दोन गस्ती पथके रात्री ८ ते १२ या वेळेत शहरभर फिरून कारवाई करत आहेत. मिरकरवाडा, झारणी रोड परिसरात या मोहिमेचा पहिला टप्पा पार पडला.कारवाईदरम्यान पथकाला अनेक विचित्र आणि थरारक प्रसंगांचा सामना करावा लागला. काही नागरिक कचरा टाकताना पकडले गेल्यावर पथकावर धावून गेले, तर काहींनी आम्हीच पुन्हा उचलतो अशा सबबी मांडल्या. काही ‘हुशार’ नागरिकांनी तर रात्री गस्त संपल्यानंतर पहाटे उठून पुन्हा कचरा टाकण्याची करामत केली.
आरोग्य निरीक्षक कांबळे यांनी सांगितले की, शहरात सकाळ, दुपार आणि रात्री घंटागाड्या फिरत असतानाही काही नागरिक सर्रास रस्त्यावर कचरा टाकतात. ही प्रवृत्ती थांबवण्यासाठी पुढील काळात कठोर कारवाई सुरू ठेवली जाणार आहे.ही कारवाई ‘महाराष्ट्र अविघटनशील घनकचरा नियंत्रण नियम २००६’ आणि ‘उपविधी २०१७’ अंतर्गत करण्यात आली आहे. पालिकेने स्पष्ट इशारा दिला आहे की, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर केवळ दंडच नव्हे तर पुढील कठोर उपाययोजना करण्यात येणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी