अकोला, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
अकोला शहर पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल, दुचाकी वाहने आणि इतर मौल्यवान वस्तू मूळ मालकांना परत देण्यात यश मिळवले आहे. मागील सहा महिन्यांमध्ये नागरिकांचे गर्दीच्या ठिकाणांहून तसेच घरातून तब्बल १ कोटी ३० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता, जो अकोला पोलिसांनी शोधून मूळ मालकांकडे सुपूर्द केला आहे.पोलिसांनी विशेष मोहिम राबवून चोरीच्या मोबाईल फोनचा मागोवा घेतला. विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून संबंधित व्यक्तींना शोधण्यात आले आणि त्यांच्याकडून मोबाईल तसेच इतर वस्तू जप्त करून मूळ मालकांना परत देण्यात आल्या.या मोहिमेत काही दुचाकी आणि मौल्यवान वस्तूंचाही समावेश आहे.आपल्या
मोबाईल आणि मौल्यवान वस्तू परत मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आहे. दिवाळीपूर्वी आपल्या मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांनीच आपली दिवाळी उजळवली असल्याचं समाधान व्यक्त केलं आहे.चोरट्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा तसेच चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचा अकोला पोलिसांचा जोर कायम असल्याचं पोलिस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे