मतदार याद्यांमधील घोळ तपासा, निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
मुंबई, 18 ऑक्टोबर (हिं.स.) - राज्यातील मतदारयाद्यांमध्ये घोळ असल्याचे वारंवार विरोधी पक्षांकडून ओरड होत आहे. त्यातच नुकतेच मविआ नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्रित निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत तक्रारींचा सूर आळवला. यावेळी घोळाबा
राज्य निवडणूक आयोग


मुंबई, 18 ऑक्टोबर (हिं.स.) - राज्यातील मतदारयाद्यांमध्ये घोळ असल्याचे वारंवार विरोधी पक्षांकडून ओरड होत आहे. त्यातच नुकतेच मविआ नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्रित निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत तक्रारींचा सूर आळवला. यावेळी घोळाबाबत पुरावे आणि माहिती दिली. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना मतदार यादीमधील घोळ तपासण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे मविआसह राज ठाकरे यांनी केलेल्या मागणीला मोठे यश आल्याचे दिसत आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदा मतदार यादीमधील घोळ समोर आणताना वारंवार महाराष्ट्र आणि कर्नाटकचा उल्लेख केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसह मनसे नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगासह आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची भेट घेतली होती. एकाच कुटुंबामध्ये शेकडो नावे नोंदवल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे मनसेकडून तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर आयोगाचे अधिकारी निरुत्तर झाल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मतदारयादींच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एकाच मतदारसंघामध्ये या महिलेचे दोन ठिकाणी नावे कशी आली, याबाबत चौकशी केली जाईल. यामध्ये जे अधिकारी दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दिवाळी असल्यामुळे कदाचित पुढील आठवड्यात हा संपूर्ण अहवाल येण्याची शक्यता आहे. हा अहवाल आल्यानंतर आरोप केलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्याची प्रत दिली जाईल.

विरोधकांनी नागपूरमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर 200 मतदार असल्याचा गंभीर आरोप केला होता. चौकशीनंतर समोर आले आहे की हे मतदार झोपडपट्टी परिसरातील आहेत. जयश्री मेहता या महिलेचे दहिसर आणि चारकोपसह एकूण चार ठिकाणी मतदान असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मोहन नंदा बिलवा या महिलेचे नाव मतदार यादीत तीन ठिकाणी आढळले असल्याचा आरोप करण्यात आला होता. आता राज्यातील विरोधकांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी मागणी केली होती त्याला मोठं यश आलं आहे. जोपर्यंत सदोष यादी आहे तोपर्यंत निवडणुकाच घेऊ नका, गेल्या पाच वर्षांपासून निवडणुका थांबवल्या आहेत, तर आणखी सहा महिने निवडणुका पुढे गेल्यास काय फरक पडतो, अशी विचारणा करत उद्धव ठाकरे तसेच राज ठाकरे यांनी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा आम्ही या संदर्भात आवाज उठवूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे म्हटले होते.

राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीमधील शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन मोठे आरोप केले होते आणि पुरावेही सादर केले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande