गाडीतील सर्व प्रवासी सुरक्षित, कोणतीही जीवितहानी नाही
सरहिंद, 18 ऑक्टोबर (हिं.स.) : अमृतसरहून सहरसाकडे जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसला सरहिंदजवळ शनिवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत ट्रेनचे 3 सामान्य (जनरल) डबे पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवाशांना वेळेवर सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि त्याचा तपास सुरू आहे.
गरीब रथ एक्सप्रेस सरहिंद रेल्वे स्थानक ओलांडून अंबालाच्या दिशेने सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असताना आज, शनिवारी सकाळी ही घटना घडली. गाडीच्या एका डब्यातून अचानक धूर निघताना दिसल्यावर तातडीने ट्रेन थांबवण्यात आली. काही क्षणांतच आग 3 डब्यांमध्ये पसरली.सरहिंद जीआरपीचे एसएचओ रतन लाल यांनी सांगितले की, धूर दिसताच ट्रेन त्वरित थांबवण्यात आली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. कुणालाही इजा झाली नाही. तीन डबे पूर्णपणे जळून नष्ट झाले आहेत. आग कशामुळे लागली, याचा तपास सध्या सुरू आहे.
या घटनेवर रेल्वे मंत्रालयानेही प्रतिक्रिया दिली असून त्यांनी सांगितले की, ट्रेन क्रमांक 12204 — अमृतसर–सहरसा गरीब रथ एक्सप्रेसच्या एका डब्यात पंजाबमधील सरहिंद स्टेशनजवळ सकाळी आग लागली होती. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे.रेल्वे प्रशासन आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. रेल्वेने प्रवाशांसाठी पुढील प्रवासाच्या सोयी करण्याची व्यवस्था केली आहे.अधिक तपास सुरू असून, आग कशामुळे लागली यासंदर्भात लवकरच अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
---------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी