मुंबई, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांकडून येत्या १ नोव्हेंबर रोजी मुंबईत विराट सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चाद्वारे निवडणूक आयोगाच्या भूमिकेचा निषेध आणि मतदार याद्यांतील घोळाबाबत तीव्र भूमिका घेण्यात येणार आहे. या मोर्चाची घोषणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे घेतलेल्या सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे सचिन सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी उपस्थित होते.
संजय राऊत म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात लढाई लढत आहोत. महाराष्ट्राच्या मतदार यादीत सुमारे ९६ लाख मतदार घुसखोर आहेत. ही ‘मॅच फिक्सिंग’ विरोधातील लढाई आहे. निवडणूक यादीत घुसलेले एक कोटी बोगस मतदार बाहेर काढावेत, अशी मागणी आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करतो.” त्यांनी पुढे सांगितले की, अनेक सत्ताधारी आमदारांनीही मतदार याद्यांतील दुबार आणि बोगस नावांबाबत आवाज उठवला आहे. “मतदार यादी पवित्र असली पाहिजे आणि या उद्देशाने १ नोव्हेंबरला आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात विराट मोर्चा काढणार आहोत,” असे राऊत म्हणाले.
या मोर्चाचे नेतृत्व उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते करणार असून, हा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे, असेही राऊत यांनी सांगितले. “दिल्लीमध्ये अशा प्रकारचा मोर्चा झाला होता आणि सर्व नेते त्यात सहभागी झाले होते. या मोर्चालाही सर्वांचा पाठींबा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे नेते सचिन सावंत म्हणाले की, “आम्ही केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळासह भेट दिली होती. राहुल गांधी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान ४१ लाख मतदार वाढल्याचे निदर्शनास आणले होते, मात्र निवडणूक आयोगाने हात झटकले. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे, आदर्श प्रक्रिया राबवली जात नाही, आणि पारदर्शकता नाही. या सर्व बाबींविरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत.”
भाकपचे नेते प्रकाश रेड्डी यांनी म्हटले की, “मतदार यादी ही पारदर्शक असली पाहिजे. निवडणूक आयोगाचा सध्याचा खुलासा जुजबी आहे. सुधारणा आवश्यक आहेत. भाजपने मतदार यादीत फेरफार करण्याची मोडस ऑपरेंडी तयार केली आहे. या अन्यायाविरोधात आम्ही मोर्चात सहभागी होऊ.”
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, “मतदार यादीतील घोळाबाबत आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले आहे, म्हणजेच घोळ झाल्याचे त्यांनाही लक्षात आले आहे. आता ते थतूरमातुर उत्तर देत आहेत, पण त्यांना चूक समजली आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जयंत पाटील म्हणाले की, “निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर समाधानकारक नाही. सत्ताधारी नेत्यांनीही या मोर्चात सहभागी व्हावे. शरद पवार यांनी मोर्चाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. दुबार मतदार काढण्यासाठी आयोगाने ठोस कार्यक्रम जाहीर करावा आणि पारदर्शकतेने खुलासा करावा.”
संजय राऊत यांनी शेवटी सांगितले की, “राज्य निवडणूक आयोग हे सरकारचे गुलाम आहे, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. पण विरोधी पक्ष म्हणून आम्हाला लोकशाहीसाठी आवाज उठवायलाच हवा.” मोर्चाचा मार्ग आणि नियोजन हे सर्व पक्ष मिळून निश्चित करतील, आणि उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे तसेच हर्षवर्धन सपकाळ यांच्या चर्चेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule