नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर (हिं.स.) - भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या, “दिवाळी या पवित्र सणानिमित्त मी भारतात आणि जगभरातील सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा देते व सद्भावना व्यक्त करते.
भारतातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक असलेली दिवाळी मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरी केली जाते. हा सण अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो. देशभरात मोठ्या भक्तिभावाने साजऱ्या होणाऱ्या या सणातून परस्पर प्रेम व बंधुत्वाचा संदेश मिळतो. या दिवशी श्रद्धाळू लोक संपत्ती व समृद्धीची देवी लक्ष्मीची पूजा करतात.
आनंदाचा हा सण आत्मचिंतन आणि आत्मविकासाचीही संधी आहे. तसेच, वंचित आणि गरजू लोकांना मदत करून त्यांच्या जीवनात आनंद आणण्याचीही ही वेळ आहे.
मी सर्वांना विनंती करते की दिवाळी साजरी करताना सुरक्षितता, जबाबदारी आणि पर्यावरणपूरकता लक्षात घ्यावी. ही दिवाळी सर्वांना आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येवो.”
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी