बीजिंग , 19 ऑक्टोबर (हिं.स.)।चीनने रविवारी अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सीवर (एनएसए) गंभीर आरोप करत म्हटलं की, एनएसएने चीनच्या नॅशनल टाइम सर्व्हिस सेंटरवर सायबर हल्ला केला आहे. चीनच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यामुळे नेटवर्क संप्रेषण, आर्थिक प्रणाली आणि वीज पुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मोठा धोका निर्माण होऊ शकला असता.
चीनच्या राज्य सुरक्षा मंत्रालयाने ‘वीचॅट’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत दावा केला की, एनएसए ने 2022 मध्ये एका विदेशी मोबाईल ब्रँडच्या मेसेजिंग सेवेमधील त्रुटींचा गैरफायदा घेतला आणि वेळ केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या उपकरणांतून संवेदनशील माहिती चोरली. मंत्रालयाने त्या मोबाईल ब्रँडचं नाव मात्र उघड केलं नाही.
मंत्रालयाने आणखी आरोप केला की, 2023 ते 2024 या काळात, अमेरिकन एजन्सीने या केंद्राच्या अंतर्गत नेटवर्क प्रणालींवर हल्ला करण्यासाठी 42 प्रकारचे विशेष सायबर हल्ल्याचे तंत्र वापरले आणि एका अत्यंत महत्त्वाच्या वेळ प्रणालीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चीनच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे याचे सबळ पुरावे आहेत, मात्र त्यांनी पोस्टमध्ये कोणतेही प्रत्यक्ष पुरावे जाहीर केलेले नाहीत. मंत्रालयाने स्पष्ट केलं की हे टाइम सर्व्हिस सेंटर चीनच्या अधिकृत वेळेच्या निर्मिती आणि वितरणाचं काम करतं, ज्याचा वापर संचार, वित्त, ऊर्जा, वाहतूक आणि संरक्षण क्षेत्रांमध्ये होतो.सरकारने केंद्राला यामुळे सुरक्षा उपाय वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
पोस्टमध्ये चीनने अमेरिकेवर टीका करत म्हटलं, “अमेरिका स्वतः हे सगळं करतं आणि इतरांवरच दोष ठेवतं.” “ते वारंवार चिनी सायबर हल्ल्यांचा खोटा प्रचार करतात.” अलीकडच्या वर्षांमध्ये पाश्चिमात्य देशांनी चीनवर आरोप केले होते की चिनी सरकारशी संबंधित हॅकर्सने अधिकाऱ्यांवर, पत्रकारांवर, कंपन्यांवर आणि विविध संस्थांवर सायबर हल्ले केले.चीनच्या या नवीन आरोपांमुळे अमेरिका आणि चीनमधील व्यापार, तंत्रज्ञान आणि तैवानशी संबंधित तणाव आणखी वाढू शकतो. अद्याप अमेरिकन दूतावासाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode