काबुल, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोहा येथील बैठकीत सीझफायरची (युद्धविरामाची) घोषणा करण्यात आली आहे.या दरम्यान, तालिबानचे उप-गृह मंत्री मावलवी मुहम्मद नबी ओमारी यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलं की, जर अफगाणिस्तानने पाकिस्तानी लष्कराला आक्रमणकारी जाहीर केलं, तर आपण त्यांना भारतीय सीमेशी पोहोचवून टाकू.
मावलवी ओमारी यांनी थेट पाक लष्कराला उद्देशून चेतावणी देताना म्हटलं की, “जर अफगाण जनजाती आणि राष्ट्राने एकदा तुम्हाला धार्मिक आदेशाद्वारे आक्रमणकारी घोषित केले, तर मी अल्लाहची शपथ घेतो तुम्हाला भारतीय सीमेशी पोहोचण्यापर्यंतही कुठेही सुरक्षितता मिळणार नाही.”
ओमारी यांनी इस्लामाबादच्या नागरी प्रशासनावर आणि सैन्य नेतृत्वावरही टीका केली. ते म्हणाले की, “पाकिस्तानचं लष्करी शासन प्रत्येक गोष्ट इतरांच्या इच्छेनुसार करतं. अलीकडेच तुम्ही शहबाज शरीफ यांचा डोनाल्ड ट्रंपबरोबर लाचारीने बोलतानाचा व्हिडिओ पाहिला असेल.”
ओमारी यांनी ड्युरंड रेषेपलीकडील प्रदेशांवरील संभाव्य दाव्याचाही संकेत दिला. ते म्हणाले की, “सध्याची परिस्थिती याकडे इशारा करते की, जे प्रदेश एकेकाळी अफगाणिस्तानने गमावले होते, ते लवकरच पुन्हा अफगाण क्षेत्रात समाविष्ट होऊ शकतात.” तालिबान नेत्याची ही चेतावणी त्या वेळी आली आहे, जेव्हा अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमारेषेवर तणाव वाढला आहे.
काबुलने इस्लामाबादवर ४८ तासांच्या युद्धविरामाचा भंग केल्याचा आरोप केला आहे. या युद्धविरामाअंतर्गत, सुमारे एक आठवड्यांपासून सुरू असलेल्या लढाईला थांबवण्यात आले होते, ज्यात दोन्ही देशांचे सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडले होते.
दरम्यान, कतरच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने दोहा येथे बैठक झाली, ज्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान युद्धविरामावर तातडीने सहमत झाले. आगामी बैठक इस्तंबूलमध्ये आयोजित केली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode