कोल्हापूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। ऐन दिवाळीच्या सणात शाहूवाडी तालुक्यात दुर्दैवी घटना घडली. परळीनिनाई येथील धरणाच्या बॅक वॉटर परिसरात भेंडवडे गावच्या हद्दीत बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दांपत्य मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रखूबाई निनो कंक (70) आणि निनो यशवंत कंक (75) असे मृत दांपत्याची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे वृद्ध दांपत्य शाहूवाडी तालुक्यातील गोलीवणे गावचे रहिवासी असून, परळीनिनाई येथील बॅकवॉटर परिसरात शेळ्यामेंढ्या चारण्यासाठी गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी लवकर शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या वृद्ध दांम्पत्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दोंघांच्याही शरीराचे जंगली प्राण्याने लचके तोडल्याचे दिसून आले. सकाळी गावकऱ्यांना ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ वनविभाग आणि पोलिसांना कळवले. वनविभागाचे अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी बिबट्याच्या वाढत्या हालचालींबाबत वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar