रत्नागिरी, 19 ऑक्टोबर, (हिं. स.) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पायाच्या गुडघ्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.
नांदिवडे (ता. रत्नागिरी) येथील ३० वर्षे वयाचे रोहित रमाकांत मेने यांना गेले दीड वर्षापासून उजव्या पायाच्या गुडघ्याची शिर आणि गादी तुटल्यामुळे गुडघेदुखीचा त्रास होता. गुडघा अडकलेला असल्याने सरळ करता येणे शक्य नव्हते. शिवाय चालताना तोल जाऊन लंगडत चालावे लागत होते. ही शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात करणे खर्चीक असल्याने श्री. मेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचाराकरिता दाखल झाले. तेथे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निखिल देवकर यांनी रोहित मेने यांच्या उजव्या गुढघ्याची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ( Arhtroscopic ACL Reconstruction) यशस्वीरीत्या केली. या शस्त्रक्रियेमुळे अडकलेला गुडघा पूर्ववत झाला असून तोल न जाता चालणे शक्य झाले आहे.
दुर्बिणीद्वारे केली जाणारी अवघड व खर्चीक शस्त्रक्रिया केवळ मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात केली जाते. ती शस्त्रक्रिया रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यशस्वीरीत्या करण्यात आली. त्याबद्दल अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सुतार, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निखिल देवकर, भूलतज्ज्ञ डॉ. मंगला चव्हाण तसेच कर्मचारी यांचे रोहित मेने व त्यांच्या कुटुंबीयांनी आभार मानले आणि मिळालेल्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी