* परिचालन सज्जता आणि सामाजिक उपक्रमांचा घेतला आढावा
नवी दिल्ली, २० ऑक्टोबर (हिं.स.) : लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मध्यवर्ती विभागातील आघाडीच्या चौक्यांना भेट देऊन तिथल्या परिचालन सज्जतेचे मूल्यांकन केले, सैनिकांचे मनोधैर्य वाढवले आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशात नागरी-लष्करी संबंध दृढ केले.
या भेटीदरम्यान, लष्करप्रमुखांनी पिथौरागढच्या उंच भागांमध्ये आणि जवळच्या आघाडीच्या चौक्यांवर तैनात असलेल्या तुकड्यांचा आढावा घेतला. त्यांना प्रगत टेहळणी यंत्रणा, विशेष वाहन प्रणाली, नवीन पिढीच्या तंत्रज्ञानाचा वापर, टेहळणी साधनांचा योग्य वापर आणि इतर सुरक्षा यंत्रणांसोबत समन्वय यांसारख्या सध्याच्या क्षमता वाढीबद्दल माहिती देण्यात आली. त्यांनी सैनिकांच्या व्यावसायिकतेचे, शिस्तीचे आणि आव्हानात्मक परिस्थितीत नवीन उपकरणांच्या नाविन्यपूर्ण वापराचे कौतुक केले.
दुर्गम भागात तैनात असलेल्या जवानांशी संवाद साधताना जनरल द्विवेदी यांनी अत्यंत प्रतिकूल हवामान आणि खडतर परिस्थितीतही त्यांच्या शौर्याची आणि कर्तव्याविषयी असलेल्या दृढ निष्ठेची प्रशंसा केली. त्यांनी स्वतःआधी सेवेला प्राधान्य (Service Before Self) या मूळ सिद्धांताचा पुनरुच्चार करत, बदलत्या सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय लष्कराच्या पूर्ण सज्जतेची खात्री दिली. लष्करप्रमुखांनी माजी सैनिक आणि स्थानिक नागरिकांशीही संवाद साधला, त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि सर्व जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कुमाऊं प्रदेशाचे, विशेषतः नेपाळ आणि चीनच्या सीमावर्ती भागांचे प्रवेशद्वार म्हणून असलेले सामरिक महत्त्व अधोरेखित करत लष्करप्रमुखांनी स्थानिकांची देशभक्ती आणि धैर्याचे कौतुक केले. त्यांनी कुमाऊं रेजिमेंटच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख केला आणि 'ऑपरेशन सद्भावना' आणि 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम' अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. यामध्ये गरब्यांग आणि कालापानी इथल्या तंबू-आधारित होम-स्टे, रस्ते पायाभूत सुविधा, हायब्रीड वीज प्रणाली, वैद्यकीय शिबिरे आणि पॉलीहाऊसद्वारे कृषी सहाय्य यांचा समावेश आहे. कुमाऊंमधले भारतीय सैन्य करुणेसह सामर्थ्य या तत्वाचे प्रतीक आहे, ते सीमांचे रक्षण करताना सीमावर्ती समुदायांना सक्षम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या दौऱ्याचा समारोप करताना, जनरल द्विवेदी यांनी परिचालनात उत्कृष्टता राखणे, नागरी-लष्करी सलोखा वाढवणे आणि देशासंबंधी कर्तव्य, सन्मान आणि सेवेच्या सर्वोच्च परंपरांचे पालन करण्याचा भारतीय लष्कराचा अतूट संकल्प पुन्हा अधोरेखित केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी