सोलापूर, 19 ऑक्टोबर, (हिं.स.)।
आपल्यासारखीच दिवाळी समाजातील गरजूंनीही साजरी करावी या हेतूने जणू सामाजिक जाणीवेचे हजारो दीप उजळले. केतन वोरा मित्रपरिवार आणि उद्योगवर्धिनीतर्फे २१ संस्थांतील ३ हजार ५०० वंचितांना फराळ वाटप करण्यात आला.
जुना एम्प्लॉयमेंट चौक येथील बी. सी. बॉईज हॉस्टेल जवळील उद्योगवर्धिनी संस्थेत हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ उद्योजक रंगनाथजी बंग, उद्योजक इंदरमल जैन, उद्योजक मेहुल पटेल, भारतीबेन पटेल, डॉ. आशिष भुतडा, उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान, केतन वोरा उपस्थित होते.
मुख पाहुण्यांच्या हस्ते २१ सामाजिक संस्थांकडे तब्बल ३ हजार ५०० जणांचा दिवाळी फराळ सुपूर्द करण्यात आला. स्वआधार संस्था, बी. सी. गर्ल्स हॉस्टेल, कतारी वस्ती, प्रार्थना फाउंडेशन, रॉबिन हूड आर्मी, हबीबा संस्था, आई संस्था, ब्रिजधाम वृद्धाश्रम, बी. सी. बॉईज हॉस्टेल, आधार संस्था आदी २१ संस्थांमधील गरजू मुले, अनाथ मुले, आधार नसलेले ज्येष्ठ नागरिक, पालावरच्या शाळा अशा गरजूंना दिवाळी फराळ देण्यात आला. बुंदीलाडू, चकली, करंजी, अनारसे, शेव, चिवडा, शंकरपाळी असे जिन्नस असलेला फराळ या गरजूंना देण्यात आला.
यावेळी रंगनाथजी बंग म्हणाले, समाजातील गरजूंचा आधार बनून वंचितांना सन्मानित करण्याचा उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम कौतुकास्पद आहे. आपल्या आनंदात समाजातील गरजूंना सहभागी करून घेण्याची ही प्रथा कायम राहणे आवश्यक आहे, असेही बंग याप्रसंगी म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड