ठाणे, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। - बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी येत्या ९ नोव्हेंबर २०२५ रोजी बंजारा समाजाच्या वतीने शिवाजी पार्कवर विशाल मोर्चा धडकणार आहे. या मोर्चात मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे चिरंजीव निरंजन नाईक हे देखील सहभागी होणार आहेत , अशी माहिती खा. हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य सरकारने १ लाख ३४ हजार तरूणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीवर घेतले. होते. आजमितीला त्यातील ७५ टक्के तरूणांचे प्रशिक्षण संपलेले आहे. आता त्यांना एक रूपयाही मिळत नाही. या तरूणांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला होता. या मोर्चाला संबोधित केल्यानंतर काही युवतींनी हरिभाऊ राठोड यांचे औक्षण केले. तसेच, हरिभाऊ राठोड यांनी दिवे प्रज्वलित करून बंजारा भाषेत गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हरिभाऊ बोलत होते.
९ नोव्हेंबर रोजी मुंबईचे ऐतिहासिक मैदान शिवाजी पार्क दादर या ठिकाणी दीपावली मिलन महामेळावा होणार असून जय सेवालालचा नारा देत पांढरं वादळ मुंबईत धडकणार आहे. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळे पर्यंत या लढ्यात खंबीर पणाने उभा राहणार असून बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक हे देवतुल्य आहेत तसेच निरंजन वसंतराव नाईक हे त्यांच्या विचारांचे पाईक असल्यामुळे ते सुद्धा बंजारा समाजाकरिता देवतुल्य आहेत.
भारतीय संस्कृती ही राजाच्या मुलाला राजा, नेत्याच्या मुलाला. नेता, तर साधुसंताच्या कुटुंबातील साधू , संत महाराज महंत मानणारे आहे वसंतराव नाईक यांच्या मुलानी या आंदोलनात उडी घेतल्यामुळे आंदोलनास बळकटी मिळणार आहे. या आंदोलनास निरंजन नाईक हे संबोधित करणार असून हे आंदोलन केवळ महाराष्ट्रपुरते न थांबता दिल्लीचा तक्तापर्यंत आम्ही घेऊन जाणार असल्याचे आंदोलनाचे मार्गदर्शक नेते, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर