ठाणे, 19 ऑक्टोबर, (हिं.स.)। माध्यमांना चौथा स्तंभ म्हणतात, लोकशाहीचा आत्मा म्हणून गौरवतात. परंतु या वर्तमानपत्रांचा पाया असलेले वर्तमानपत्र विक्रेते मात्र पिढ्यानपिढ्या दुर्लक्षितच राहिलेत. भल्या पहाटे ऊन, वारा, पाऊस, दंगली, युद्ध, कोरोना सारख्या महामाऱ्या यातूनही जीव मुठीत धरून या बहाद्दरांनी वर्तमानपत्र घराघरात पोहोचवलं. त्यांच्याच हस्ते भल्या पहाटे सकाळी चार वाजता ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावरच जनादेश दिवाळी अंकाचं अनोखं प्रकाशन पार पडलं. याच वर्तमानपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष आणि दैनिक जनादेशचे संपादक कैलाश महापदी यांनी हे अनोख प्रकाशन भल्या पहाटे पार पाडले. यावेळी संघटनेचे सरचिटणीस अजित पाटील, ठाणे शहर राष्ट्रवादीचे नूतन अध्यक्ष मनोज प्रधान आदींच्या उपस्थितीत संपूर्ण शहर गप्पगार झोपलेले असताना दिवाळीच्या पहाटे भर रस्त्यावरतीच तोंड गोड करून हे प्रकाशन पार पडलं.
माध्यमं अनेक मात्र वर्तमानपत्रासारखा दृढ विश्वास कुठेही नाही -
कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेक बुरुज ढासळले, माध्यमांनाही त्याची झळ पोचली, वर्तमानपत्रांची पीछेहाट झाली. आज जगात एआय चं तंत्रज्ञान आहे. यात हजारो प्रकारची माध्यमं स्थिरस्थावर झाली आहेत. मात्र वर्तमानपत्र वाचण्यातलं समाधान आणि वर्तमानपत्रांविषयीचा विश्वास मात्र दुसरा कुठेही सापडत नाही आणि म्हणून कितीही बदल झाले तरी वर्तमानपत्रांची गरज कधीच संपणार नाही. वर्तमानपत्र उत्तरोत्तर वाढत जातील, असा विश्वास राष्ट्रवादीचे नूतन अध्यक्ष श्री मनोज प्रधान यांनी व्यक्त केला. ते दिवाळीनिमित्त वर्तमानपत्र विक्रेत्यांना भल्या पहाटे दिवाळीसाठी भेटण्यासाठी आले होते.
ठाणे जिल्हा वर्तमानपत्र विक्रेता संघटना यांनी आयोजित केलेल्या भल्या पहाटेच्या या दिवाळी कार्यक्रमास श्री प्रधान उपस्थित होते. त्यांनी वर्तमानपत्र विक्रेत्यांना मिठाई देऊन त्यांची दिवाळी गोड केली. या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वृत्तपत्र विक्रेते हजर होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर