मुंबई, 19 ऑक्टोबर (हिं.स.) - दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि ऐक्याचा सण आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात नव्या आशा, नव्या संधी आणि समाधानाचा प्रकाश घेऊन येवो, अशा सदिच्छा व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, यंदा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे, शेतीचे तसेच पशुधनाचे अतोनात नुकसान झाले आहे. या संकट काळात आपल्या शेतकरी व पूरग्रस्त बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यांचे जीवन पुन्हा उजळविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करुया. अतिवृष्टी व पूरबाधित बांधवांना मदत करून त्यांनाही दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्याची महाराष्ट्राची सामाजिक परंपरा कायम राखूया.
दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा उजेड नव्हे, तर मनातील अंधार दूर करण्याचा संकल्प आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, अन्याय आणि अनिष्ट रुढी-प्रथांचा अंधार दूर करून विवेक, ज्ञान आणि प्रगतीचा प्रकाश आपल्या जीवनात आणूया. सामाजिक ऐक्य, बंधुता आणि सौहार्द यांची भावना दृढ करण्याचा हा सण आहे. राज्यातील सर्व नागरिकांनी प्रगती, विकास आणि सहकार्याच्या वाटेवर एकत्र चालावे, अशी अपेक्षा व्यक्त करतो. दिवाळीच्या या प्रकाशा सोबत आपल्या राज्यात शांतता, स्थैर्य आणि समृद्धीचा नवा अध्याय सुरु व्हावा, अशा सदिच्छा व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्व जनतेला दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी