अहमदाबाद, २ ऑक्टोबर, (हिं.स.). अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पाहुण्या वेस्ट इंडिजचा पहिला डाव केवळ १६२ धावांत गुंडाळला. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला.
मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी विंडीजची धावसंख्या ४० असताना चार विकेट्स घेत अडचणीत आणले. सिराजने तेग नरेन चंद्रपॉल (०), अॅलिक अथानासे (१२) आणि ब्रँडन किंग (१३) यांना बाद केले. तर जसप्रीत बुमराहने जॉन कॅम्पबेल (०८) यांना बाद केले.
त्यानंतर शाई होप (२६) यांनी चेससोबत ५० धावांची भागीदारी करून संघाची धावसंख्या ९० धावांवर नेली होती. पण कुलदीप यादवने होपला बाद केले आणि वेस्ट इंडिजला पाचवा धक्का बसला. होप बाद झाल्यानंतर सिराजने कर्णधार रोस्टन चेसला बाद केले. ज्यामुळे भारताला सहावी विकेट मिळाली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने विंडीजची धावसंख्या १४४ असताना खॅरी पियरे (११) यांना बाद केले.
त्यानंतर जसप्रीत बुमराहने दोन यॉर्कर टाकून जस्टिन ग्रीव्हज (३२) आणि जोहान लायन (०१) यांना बाद केले. कुलदीप यादवने जोमेल वॉरिकनला बाद केले आणि वेस्ट इंडिजचा डाव १६२ धावांवर संपुष्टात आणला. भारताकडून मोहम्मद सिराजने ४, जसप्रीत बुमराहने ३, कुलदीप यादवने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे