निराधार महिला भगिनींनी आनंदाने जगावे,- राजश्री आडे
परभणी, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। आयुष्यात ज्या महिला विधवा होतात, त्यात त्यांचा काहीच दोष नसतो. निसर्गाने, निर्मात्याने त्यांच्यावर ही वेळ आणलेली असते, अशा निराधार विधवा भगिनींनी आपल्या स्वतःला अपराधी समजू नये. आलेली वेळ ही वाईटच आहे पण या वेळेवर मात क
73 गरजू निराधार महिलांना किराणा किट वाटप


परभणी, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। आयुष्यात ज्या महिला विधवा होतात, त्यात त्यांचा काहीच दोष नसतो. निसर्गाने, निर्मात्याने त्यांच्यावर ही वेळ आणलेली असते, अशा निराधार विधवा भगिनींनी आपल्या स्वतःला अपराधी समजू नये. आलेली वेळ ही वाईटच आहे पण या वेळेवर मात करून उर्वरित आयुष्य आपल्या मुलांसाठी आणि आपल्यासाठी आनंदाने आणि आत्मसन्मानाने जगावे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी केले.

परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ संकुलात शेक हॅन्ड फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या निराधार महिलांना दिवाळी फराळ,साडी व किराणा वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ज्ञानतीर्थच्या कोषाध्याक्षा, उषाताई लोहट ह्या होत्या. विचारमंचावर प्रमुख पाहुणे पाहुण्या म्हणून डॉ. आशा खटिंग बोंढारे, डॉ.सीमा चौधरी देशमुख यांची उपस्थिती होती. पोलीस निरीक्षक आडे पुढे असे म्हणाल्या की, 'निराधार विधवा भगिनींना परंपरा आणि परिस्थितीचा सामना करावा लागतो. समाज, कुटुंब यांची सगळ्यांना साथ लाभेल असे नाही. अशावेळी या भगिनींनी आयुष्य रडत रडत न जगता लढत लढत जगावे'. यावेळी डॉ.आशा खटिंग बोंढारे असे म्हणाल्या की, 'महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त शक्ती असते. निसर्गाने त्यांना ही शक्ती प्रदान केली आहे परंतु समाज आणि व्यवस्थेने त्यांच्यावर विनाकारण बंधने लावली आहेत. स्त्रियांचे सगळे हक्क हिरावून घेऊन स्त्रियांच्याच कष्टावर आणि मदतीवर पुरुष संस्कृती जगते. त्यामुळे निराधार महिलांनी स्वतःला कमी न समजता धीराने आयुष्याला सामोरे जावे आणि आनंदाने जगावे. उर्वरित आयुष्य केवळ मुलांसाठी नाही तर स्वतःसाठी सुद्धा जगावे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि स्वतःला सशक्त ठेवावे आणि आयुष्याचा आनंद घ्यावा'. यावेळी डॉ. सीमा चौधरी- देशमुख यांचा पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष उषाताई लोहट यांनी निराधार भगिनींना स्वबळावर उभे राहण्याचे आवाहन केले तसेच आपण आपल्यासाठी छान जगावे आणि मुलांनाही जगवावे अशा प्रकारचे मार्गदर्शन केले. यावेळी परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७३ निराधार महिलांना दिवाळी किराणा सामान, साडी, दिवे व फराळाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी डॉ. केशव खटींग यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती चौंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेक हॅन्ड फाउंडेशनचे अध्यक्ष, शरद लोहट, सचिव संतोष चव्हाण, जिजाऊ ज्ञानतीर्थ संकुलाचे प्रमुख नितीन लोहट, भरत भालेराव,नितीन तांदळे,रवी लोहट,वैभव ठाकूर,पांडुरंग चव्हाण,अजय महाजन,शाम गाडेकर,उषा घोडके,अर्चना पावडे,भास्कर वाघ,प्रदीप काळे,ओम सूर्यवंशी,धर्मराज बहिरट,राजू पांचाळ,विकास पांचाळ आदींनी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande