रत्नागिरी, 20 ऑक्टोबर, (हिं. स.) : पूर्वी लहान मुलांनी प्रश्न विचारले की पालक पाप-पुण्याचा विषय असल्याचे सांगत. आताच्या विद्यार्थ्यांना भारत शिकवण्यासाठी वैज्ञानिक आधारावर आपली प्राचीन परंपरा शिकवली पाहिजे. जुन्या गोष्टी नवी दृष्टीने सांगितल्या पाहिजेत, भारतीय संस्कृतीचा अभिमान जपणारा माणूस म्हणून घडवणे आवश्यक आहे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करावे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ प्रा. दिलीप बेतकेकर यांनी केले.
अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा प्रारंभ आज डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातून आतापर्यंत ५० हजारांहून विद्यार्थी शिकून गेले. त्यांचे पालक, माजी शिक्षक हा सर्व मोठा डेटा असून याद्वारे महाविद्यालयाने नवनवीन उपक्रम हाती घ्यावेत हे सांगताना कायदेतज्ज्ञ नानी पालखीवाला, स्वामी विवेकानंद, पं. दीनदयाळ उपाध्याय, डॉ. कलाम आदींचे संदर्भ व गोष्टी त्यांनी सांगितल्या. शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणायचे की आयटी-आयटी भरपूर झाले. आता टीआय-टीआय म्हणजे थिंक इंडिया, टीम इंडिया साकारली पाहिजे. जिथे संधी नाही ते शिक्षण देऊन संधी निर्माण केली पाहिजे, असेही बेतकेकर म्हणाले.
याप्रसंगी मंचावर र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी व नियामक मंडळ सदस्य डॉ. संजय केतकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य सुनील गोसावी उपस्थित होते.
डॉ. साखळकर यांनी सांगितले की, महाविद्यालयास मोठी परंपरा लाभली आहे. माजी विद्यार्थी आज तज्ज्ञ डॉक्टर, इंजिनियर, सीए आणि वकील झाले आहेत. अभ्यंकर व जोगळेकर यांच्या देणगीमुळे महाविद्यालयाला बळ मिळाले. र. ए. सोसायटीचे संस्थापक बाबुराव जोशी व मालतीबाई जोशी यांच्या दूरदृष्टीमुळे कोकणातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ लागले. त्यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे.
शिल्पाताई पटवर्धन आणि प्रा. दुदगीकर यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकामध्ये प्रा. गोसावी यांनी महाविद्यालयाची प्रगती व वर्षभरातील कार्यक्रमांची माहिती दिली. सुरवातीला महाविद्यालय गीत, त्यानंतर दृक्श्राव्य ध्वनी चित्रफीत सादरीकरण करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी