जळगाव , 20 ऑक्टोबर (हिं.स.)जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईपोटी ३३९ कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ऐन दिवाळीच्या काळात ही रक्कम मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.या योजनेंतर्गत जिल्ह्यातील जवळपास ७२ हजार शेतकऱ्यांनी केळी पीक विमा काढला होता. गेल्या वर्षी हिवाळ्यातील कमी तापमान आणि उन्हाळ्यातील जास्त तापमानाच्या निकषांमध्ये जिल्ह्यातील सुमारे ५६ ते ६० महसूल मंडळे भरपाईसाठी पात्र ठरली होती. त्यानुसार, आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग केली जात आहे. वादळी पावसाच्या भरपाईची रक्कम लवकरच सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारी ३३९ कोटींची रक्कम ही केवळ कमी व जास्त तापमानाच्या निकषात पात्र ठरलेल्या नुकसानीसाठी आहे. वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची रक्कम अद्याप प्राप्त झालेली नाही. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सुमारे १०० कोटींपर्यंतची रक्कम लवकरच मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. पीक विमा कंपनीकडून अद्याप महसूल मंडळे किंवा पात्र शेतकऱ्यांची अधिकृत यादी जाहीर झाली नसली तरी, शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष रक्कम जमा होत असल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.यंदा कृषी विभागाने केळी पीक विमाधारकांची सखोल पडताळणी मोहीम राबवली होती. काही शेतकऱ्यांनी शेतात केळी लागवड नसतानाही विमा काढल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पडताळणीनंतर, सुमारे ३ ते ४ हजार शेतकरी या योजनेतून अपात्र ठरले आहेत. यामुळे गरजू शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे सुरक्षित राहिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर