रत्नागिरी, 20 ऑक्टोबर, (हिं. स.) : येथील जनसेवा ग्रंथालयाचे उत्कृष्ट वाचक पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ लेखिका स्व. स्मिता राजवाडे यांच्या संकल्पनेतून जनसेवा ग्रंथालयातर्फे दरवर्षी उत्कृष्ट वाचक पुरस्कार देण्यात येतात. जनसेवा ग्रंथालयाच्या सभासद-वाचकांमधून जनसेवा ग्रंथालयाची पुरस्कार निवड समिती विजेत्यांची निवड करते. यावर्षी बालगटातून दोन व मोठ्या गटातून दोन अशा चार वाचकांना उत्कृष्ट वाचक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये बालगटातून शारदा अभ्यंकर व स्पृहा भावे या विद्यार्थिनी उत्कृष्ट वाचक पुरस्कार विजेत्या ठरल्या, तर मोठ्या गटातून नरेश पाडळकर व श्रीया पटवर्धन हे वाचक उत्कृष्ट वाचक पुरस्कार विजेते ठरले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना सन्मानपत्र, पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बालवाचकांनी आपल्या वाचन आवडीविषयी मनोगते मांडली. अमोल पालये यांनी पुरस्कार निवड प्रक्रिया समजावून सांगितली. कार्यक्रमाला जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, कार्यवाह राहुल कुलकर्णी, ग्रंथपाल अनुजा पटवर्धन, ग्रंथालयाचे कर्मचारी सुजाता कोळंबेकर, सौ. भोसले, वाचक, सभासद उपस्थित होते. जनसेवा ग्रंथालयातर्फे देण्यात येणार्या वाचक पुरस्कार विजेत्यांसोबत डॉ.किशोर सुखटणकर, प्रकाश दळवी, अमोल पालये व इतर.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी