इस्लामाबाद, 22 ऑक्टोबर (हिं.स.) पाकिस्तानचा ३८ वर्षीय फिरकी गोलंदाज आसिफ आफ्रिदीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत कसोटी पदार्पणात इतिहास रचला. आपल्या पहिल्याच कसोटीत आफ्रिदीने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या. यासह ३८ वर्षीय पाकिस्तानी फिरकी गोलंदाजाने ९२ वर्षे जुना विक्रम मोडित काढला. आसिफ आफ्रिदी कसोटी पदार्पणात 5 विकेट्स घेणारा जगातील सर्वात वयस्कर गोलंदाज ठरला आहे.
पेशावरच्या आसिफ आफ्रिदीने वयाच्या ३८ वर्षे आणि ३०१ दिवसांत ही कामगिरी केली. आसिफ आफ्रिदीपूर्वी हा विक्रम इंग्लंडचे लेग-स्पिनर चार्ल्स मॅरियट यांच्या नावावर होता. चार्ल्स मॅरियट यांनी १९३३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ओव्हल येथे वयाच्या ३७ वर्षे आणि ३३२ दिवसांत ही कामगिरी केली होती. त्यांनी पहिल्या डावात ५ विकेट्स आणि दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या होत्या.
१८ ऑक्टोबर १९९२ रोजी हरारे येथे झिम्बाब्वेसाठी भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ८६ धावांत ५ विकेट्स घेतल्या तेव्हा जॉन ट्रायकोस ४५ वर्षे आणि २१५ दिवसांचे होते. पण झिम्बाब्वेसाठी खेळण्यापूर्वी त्यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी तीन कसोटी सामने खेळले होते.
कसोटी क्रिकेटमध्ये पाच विकेट्स घेणारा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू म्हणजे बर्ट आयर्नमॉन्गर आहे. १२ फेब्रुवारी १९३२ रोजी मेलबर्न येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १८ धावांत ६ विकेट्स घेतल्या तेव्हा त्यांचे वय ४९ वर्षे आणि ३११ दिवस होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे