नवी दिल्ली, २२ ऑक्टोबर (हिं.स.) ऑलिंपिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान करण्यात आली. लेफ्टनंट कर्नल (मानद) नीरज चोप्रा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संरक्षण मंत्र्यांनी चिकाटी, देशभक्ती आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्याच्या भारतीय भावनेचे मूर्त स्वरूप म्हणून त्याचे वर्णन केले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी साउथ ब्लॉक येथे झालेल्या पाइपिंग समारंभात भालाफेकपटू आणि दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता नीरज चोप्राला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलच्या मानद पदकाचे चमकदार चिन्ह औपचारिकपणे प्रदान केले. राजनाथ सिंह म्हणाले की, नीरज चोप्रा शिस्त, समर्पण आणि राष्ट्रीय अभिमानाच्या सर्वोच्च आदर्शांना मूर्त रूप देतो. तो क्रीडा जगत आणि सशस्त्र दलांसाठी प्रेरणास्थान आहे. याप्रसंगी लष्करप्रमुख जनरल द्विवेदी आणि भारतीय लष्कर आणि प्रादेशिक लष्कराचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
२४ डिसेंबर १९९७ रोजी हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील खंद्रा गावात जन्मलेला नीरज चोप्राने आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्समध्ये उल्लेखनीय कामगिरी करून देशाला आणि सशस्त्र दलांना गौरव मिळवून दिला आहे. २०१६ मध्ये तो भारतीय सैन्यात दाखल झाला आणि राजपुताना रायफल्समध्ये सेवा बजावली. २०२० च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये ट्रॅक अँड फील्डमध्ये ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणारा हा भालाफेकपटू पहिला भारतीय खेळाडू बनून इतिहास रचला. २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक आणि २०२३ च्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून त्याने आपली प्रभावी कामगिरी सुरू ठेवली. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ आणि डायमंड लीग स्पर्धांमध्येही अनेक सुवर्णपदके जिंकली आहेत. ९०.२३ मीटर (२०२५) ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ही भारतीय क्रीडा इतिहासातील एक मैलाचा दगड ठरली आहे.
आपल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि देशासाठी अनुकरणीय सेवेसाठी, लेफ्टनंट कर्नल (मानद) नीरज चोप्राला यावर्षी 16 एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रादेशिक सैन्यात मानद कमिशन प्रदान केले. यापूर्वी त्यांना पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, परम विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे