नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर (हिं.स.) : आनंद विहार-सहरसा अमृत भारत एक्सप्रेसमध्ये आज, बुधवारी बस्तीजवळ स्फोट झाला. या स्फोटामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढून ट्रेन थांबवली आणि घाईघाईने खाली उतरून पळू लागले. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि प्रवाशांना शांत केले. सध्या प्राथमिक अंदाजानुसार हा स्फोट फटाक्यामुळे झाल्याचे मानले जात आहे. याच दरम्यान, रेल्वे ट्रॅकवर एका युवकाचा मृतदेह सापडला असून, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. जीआरपी या घटनेची सखोल चौकशी करत आहे.
आनंद विहारहून बिहारच्या सहरसाकडे जाणाऱ्या 15558 डाउन अमृत भारत एक्सप्रेसच्या एका डब्यात आज, बुधवारी पहाटे सुमारे 2.45 वाजता स्फोट झाला. घटनेच्या वेळी गाडी गौर रेल्वे स्थानकाजवळील ओव्हरब्रिजच्या जवळ पोहोचली असताना अचानक प्रवाशांनी साखळी ओढून ती थांबवली. एका डब्यातील प्रवासी घाईने खाली उतरून सैरावैरा पळू लागले. विचारणा केल्यावर प्रवाशांनी सांगितले की, ट्रेनमध्ये स्फोट झाला आहे. भीतीच्या वातावरणामुळे काही प्रवासी रुळांवरूनच धावू लागले. लगेचच गौर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रवाशांना समजावून पुन्हा ट्रेनमध्ये बसवले. ट्रेन जवळपास 34 मिनिटे ओव्हरब्रिजखाली थांबली होती. नंतर सिग्नल मिळाल्यावर ती आपल्या पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
स्थानिक लोकांच्या मते, दोन प्रवासी या घटनेत किरकोळ भाजले आहेत. एखादा प्रवासी फटाके घेऊन प्रवास करत असावा आणि त्यातच अचानक स्फोट झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जातेय. या संदर्भात जीआरपी बस्तीचे निरीक्षक पंकज कुमार यांनी सांगितले की, ट्रेनमध्ये स्फोटासारखा काही आवाज झाला असल्याची माहिती मिळाली आहे आणि तपास सुरू आहे. दरम्यान गौर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम टोकाला डाउन ट्रॅकच्या कडेला एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला. जीआरपीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला, मात्र ओळख पटलेली नाही. ट्रेनमध्ये झालेल्या गोंधळादरम्यान हा युवक खाली पडून मृत्यूमुखी पडला असावा अशी शक्यता व्यक्त केली जातेय. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जीआरपी निरीक्षक पंकज कुमार यांनी सांगितले की, गोंधळादरम्यान युवक ट्रेनमधून पडल्याचे अद्याप निश्चित झालेले नसून घटनेची चौकशी सुरू आहे.----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी