इस्लामाबाद, 23 ऑक्टोबर (हिं.स.)पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम राष्ट्रीय टी-२० संघात परतला आहे. डिसेंबर २०२४ मध्ये पाकिस्तानच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याची टी-२० संघात निवड झाली नव्हती. आशिया कपमधील पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्यांच्या फलंदाजीच्या कमकुवतपणा उघड झाला होता.
एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलेला यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान पुन्हा एकदा टी-२० संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. बाबरचे टी-२० संघात पुनरागमन पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या चार महिने आधी झाले आहे. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी आणि मायदेशात होणाऱ्या श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या तिरंगी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. त्यांनी नवीन कर्णधार शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी देखील आपला एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. दोन्ही एकदिवसीय मालिकांसाठी रिझवानला विकेटकीपर म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.
पाकिस्तान प्रथम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० आणि तीन एकदिवसीय मालिका खेळेल. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल. अफगाणिस्तानने ज्या टी-२० तिरंगी मालिकेतून माघार घेतली आहे, ती १७ नोव्हेंबरपासून खेळवली जाईल. लेग-स्पिनर शादाब खान सलमान अली आघा यांची टी-२० कर्णधार म्हणून जागा घेण्याची शक्यता होती. पण आशिया कपमध्ये खराब कामगिरीनंतरही निवडकर्त्यांनी आघाला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शादाबला टी-२० संघात स्थान देण्यात आलेले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे