कॅनबेरा, 23 ऑक्टोबर, (हिं.स.) - भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक महत्त्वाचा टप्पा गाठला. पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहितने दुसऱ्या सामन्यात शानदार फलंदाजी केली आणि त्याचे ५९ वे एकदिवसीय अर्धशतक झळकावले. रोहितच्या खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियासमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले. रोहित भारताचा एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.
या शानदार खेळीमुळे रोहित शर्मा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकत एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. गांगुलीने भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये ११,२२१ धावा केल्या आहेत, तर रोहितने आतापर्यंत ११,२४९ धावा केल्या आहेत. या बाबतीत विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर रोहितच्या पुढे आहेत. कोहलीकडे सध्या १४,१८१ धावा आहेत, तर सचिनकडे १८,४२६ धावा आहेत.
रोहितने या सामन्यात जबाबदारीने फलंदाजी केली आणि ७४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहित चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता आणि त्याने नेहमीच्या शैलीने आपले शॉट्स खेळले. पण रोहितने १० वर्षांतील एकदिवसी कारकिर्दीतील सर्वात धीम्यागतीने एकदिवसीय अर्धशतक झळकावले. या सामन्यात रोहितने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. बाद होण्यापूर्वी ७३ धावा केल्या. दरम्यान, श्रेयस अय्यरने ६१ धावा केल्या. रोहित आणि श्रेयसने तिसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांमुळे आणि हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांच्या भागीदारीमुळे भारताने ५० षटकांत नऊ बाद २६४ धावा करण्यात यश आलं.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे