सोलापूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।
दत्तात्रय भरणे जरी पक्ष सोडून गेला तरी राष्ट्रवादी पक्षाला फरक पडत नाही. पक्षाची दुसरी यंत्रणा तयार असते असे सांगत मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे स्पष्टच बोलल्याचे दिसून आले. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी युती करण्यासाठी महायुतीची तयारी आहे परंतु ऐनवेळी युती फिस्कटली तर स्वबळाची तयारी ठेवा अशा सूचनाही भरणे यांनी सोलापुरात घेतलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या.
माजी आमदार संजय शिंदे यांच्या निमगाव येथील फार्म हाऊसवर ग्रामीणची बैठक घेतल्यानंतर राज्याचे कृषिमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहावर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.या बैठकीला शहराचे अध्यक्ष संतोष पवार जिल्हाध्यक्ष उमेश पाटील कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश नेते आनंद चंदनशिवे किसन जाधव नव्याने प्रवेश केलेले चंद्रकांत दायमा, माजी नगरसेवक तौफीक शेख, युवा नेते नजीब शेख, महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम, युवक अध्यक्ष सुहास कदम, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, इरफान शेख यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड