रत्नागिरी, 23 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरीतील थिबा राजाकालीन बुद्धविहाराच्या ठिकाणी होत असलेले आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी येत्या २७ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्यात येणार आहे.
नियोजित ठिकाणी कम्युनिटी सेंटर रद्द करण्यात यावे, थिबा राजाकालीन बुद्धविहाराचे उठवलेले आरक्षण पूर्ववत करावे, थिबा राजाकालीन बुद्धविहारासाठी राखीव ठेवलेली जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावी अशा महत्त्वाच्या मागण्यांसाठी बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन विराट आंदोलन उभारले आहे. हा संघर्ष एका जागेचा असला तरी तो न्याय, समानता आणि स्वाभिमानाच्या लढ्याचे प्रतीक ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
थिबा राजाकालीन बुद्ध विहार बचाव आंदोलनांतर्गत येत्या २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बौद्ध समाजाच्या विराट मोर्चाच्या तयारीसाठी स्वतंत्र पथकांद्वारे गावागावांत पत्रकांचे वितरण आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या जनजागृती मोहिमेला बौद्ध बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक विभागानुसार प्रचार-प्रसार सुरू आहे. पथकांमध्ये सुनील आंबुलकर आंबुलकर, किशोर पवार, दिवेन कांबळे, रूपेश कांबळे आणि राजेंद्र कांबळे या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाने बावीसहून अधिक खेड्यांमध्ये प्रभावी प्रचार सुरू आहे. त्यामध्ये कळझोंडी, खरवते, कोतवडे, पिरंदवणे, बसणी, नेवरे, मालगुंड, वेतोशी, जांभरूण आदी गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये घराघरांत भेट देऊन जनसंपर्क साधून आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे.
दुसरे पथक प्रकाश पवार व रणजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली पावस विभागात कार्यरत आहे. या पथकाने पूर्णगड, पावस, मावळंगे, गावडे आंबेरे, शिवार आंबेरे, दाभीळ आंबेरे, डोर्ले तसेच परिसरातील इतर गावांमध्ये फिरून नागरिकांपर्यंत पत्रके पोहोचवली आणि मोर्चाचे महत्त्व पटवून दिले. तिसऱ्या पथकाने पाली विभागातील वेळवंड, चरवेली, पाली, खानू, निवसर आदी गावांचा दौरा केला आहे. शिवराम कदम, मुकुंद कांबळे, भरत कांबळे आणि भय्या पवार आदी कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन पत्रके वितरण करून आंदोलनाचा उद्देश जनतेसमोर मांडला आहे.
या सर्व पथकांच्या उत्साही सहभागामुळे आणि प्रभावी जनसंपर्क मोहिमेमुळे थिबा राजाकालीन बुद्ध विहार बचाव आंदोलनांतर्गत होणारा मोर्चा कोणत्याही परिस्थितीत यशस्वी ठरणार आहे, अशी भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी