कॅनडा पोस्टने दिवाळी थीमवर आधारित टपाल तिकिट केले जारी
ओटावा, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। कॅनडाच्या ‘कॅनडा पोस्ट’ या टपाल सेवेनं देशातील बहुसांस्कृतिक परंपरा आणि विविधतेचा उत्सव साजरा करण्यासाठी दिवाळी थीमवर आधारित एक नवीन स्मारक टपाल तिकीट जारी केलं आहे. ओटावाचा हा निर्णय कॅनडा आणि भारत यांच्यातील पुन्हा साम
कॅनडा पोस्टने दिवाळी थीमवर आधारित टपाल तिकिट केले जारी


ओटावा, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। कॅनडाच्या ‘कॅनडा पोस्ट’ या टपाल सेवेनं देशातील बहुसांस्कृतिक परंपरा आणि विविधतेचा उत्सव साजरा करण्यासाठी दिवाळी थीमवर आधारित एक नवीन स्मारक टपाल तिकीट जारी केलं आहे. ओटावाचा हा निर्णय कॅनडा आणि भारत यांच्यातील पुन्हा सामान्य होत असलेल्या संबंधांना मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. ओटावामधील भारतीय उच्चायोगाने शुक्रवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून या उपक्रमाचे कौतुक केले.

भारतीय उच्चायोगाने दिवाळीच्या निमित्तानं पारंपरिक रांगोळीच्या डिझाइनवर आधारित तिकीट जारी केल्याबद्दल ‘कॅनडा पोस्ट’चे आभार मानले. ‘कॅनडा पोस्ट’नं आपल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे, “दिवाळी हा सण केवळ कॅनडातच नव्हे, तर हिंदू, शीख, बौद्ध, जैन आणि इतर अनेक समुदायांकडून जगभर साजरा केला जातो. या प्रसंगी देशाच्या सांस्कृतिक विविधतेचा सन्मान करत विशेष टपाल तिकीट जारी करणं आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”

संस्थेने आपल्या निवेदनात रांगोळी कलेचं सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केलं आहे. त्यांनी सांगितलं,“रांगोळी ही केवळ सर्जनशीलतेची अभिव्यक्ती नसून, ती स्वागत आणि शुभेच्छांचे पारंपरिक प्रतीक आहे. दिवाळीच्या काळात घरांमध्ये, अंगणात आणि प्रवेशद्वारांवर फुलांच्या पाकळ्या, धान्य, रंगीत वाळू आणि तांदळाच्या साहाय्यानं सुंदर रांगोळ्या काढल्या जातात.”

कॅनडाची प्रमुख टपाल सेवा संस्था ‘कॅनडा पोस्ट’ २०१७ पासून दरवर्षी दिवाळी थीमवर विशेष तिकीट जारी करते.या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये जारी करण्यात आलेल्या तिकीटाची रचना भारतीय वंशाच्या कलाकार ऋतु कनाल यांनी केली आहे. तिकीटावर आकर्षक रांगोळीचं चित्र आहे आणि त्यावर ‘दिवाळी’ हा शब्द हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये अंकित करण्यात आला आहे. या उपक्रमाला कॅनडामधील भारतीय समुदाय आणि विविध सांस्कृतिक परंपरांना सन्मान देणारे एक सकारात्मक पाऊल म्हणून पाहिलं जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande