
नवी दिल्ली , 27 ऑक्टोबर (हिं.स.)। भारताचे सरन्यायाधीश बी.आर गवई यांनी केंद्र सरकारकडे न्यायमूर्ती सूर्यकांत यांना पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची शिफारस केली आहे. जर केंद्र सरकारने ही शिफारस मान्य केली, तर सरन्यायाधीश गवई 23 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर, 24 नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे 53 वे सरन्यायाधीश बनतील.
सध्याचे सरन्यायाधीश गवई 23 नोव्हेंबर रोजी पदमुक्त होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश गवई नंतर, न्यायमूर्ती सूर्यकांत सुप्रीम कोर्टमधील दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. नियुक्तीनंतर न्यायमूर्ती सूर्यकांत 24 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारतील आणि ते 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत सुमारे 15 महिने या पदावर राहतील.
हरियाणाच्या हिसारमध्ये जन्मलेले न्यायमूर्ती सूर्यकांत सध्या सुप्रीम कोर्टमधील दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. त्यांनी 1981 साली गव्हर्नमेंट पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज, हिसार येथून पदवी प्राप्त केली आणि 1984 साली रोहतक येथील महर्षि दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी पूर्ण केली. त्याच वर्षी त्यांनी हिसार जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली.
एक वर्ष येथे काम केल्यानंतर ते पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्यासाठी गेले. 2004 साली त्यांची पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. न्यायमूर्ती सूर्यकांतांना 2018 साली हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले आणि त्यानंतर 24 मे 2019 रोजी त्यांना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode