
अंकारा , 28 ऑक्टोबर (हिं.स.)।तुर्कियेच्या पश्चिम भागात सोमवारी (दि.२७) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.1 मोजली गेली आहे.हा भूकंप स्थानिक वेळेनुसार रात्री 10:48 वाजता जाणवला. या धक्क्यांची तीव्रता इस्तंबूल, बुरसा, मनिसा आणि इझमिर या प्रांतांमध्येही जाणवली.
आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन संस्थाच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र बालीकेसिर प्रांतातील सिंदिर्गी या शहरात होते. भूकंप सुमारे 5.99 किलोमीटर खोलीवर आला. मुख्य धक्क्यानंतर अनेक आफ्टरशॉक्स ही जाणवले. या धक्क्यांमुळे सिंदिर्गी शहरात तीन इमारतींना नुकसान झाले आणि एक दोन मजली दुकान कोसळले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अद्याप कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही.
तुर्कियेचे गृह मंत्री अली यरलिकाया यांनी सांगितले की जी इमारती कोसळल्या त्या आधीपासूनच रिकाम्या होत्या. दरम्यान, दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिंदिर्गी जिल्हा प्रशासनानेही सांगितले की अद्याप कोणाच्या मृत्यूची पुष्टी झालेली नाही, परंतु परिस्थितीचे पुनरावलोकन सुरू आहे. त्यांनी हेही सांगितले की भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक घाबरले असून अनेकांनी रात्र रस्त्यावरच घालवली.
तुर्किये हे अशा देशांपैकी एक आहे जे सक्रिय भ्रंश रेषांवर स्थित असल्यामुळे वारंवार भूकंपांना सामोरे जाते. यावर्षी ऑगस्ट महिन्यात उत्तर-पश्चिम बालीकेसिर प्रांतातील सिंदिर्गी येथे 6.1 तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि डझनभर लोक जखमी झाले होते. त्यानंतर या भागात लहान लहान धक्के सतत जाणवत आहेत.
--------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode