
इस्लामाबाद , 28 ऑक्टोबर (हिं.स.)।कराचीमध्ये एका टेलिव्हिजन चॅनेलवर इस्रायलच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्यानंतर एका पत्रकाराची कट्टरपंथी इस्लामी गटाच्या कार्यकर्त्यांनी हत्या केली आहे. या घटनेची माहिती सिंध प्रांताचे गृह मंत्री यांनी दिली आहे.
कराचीच्या मालिर परिसरात 21 सप्टेंबर रोजी, टेलिव्हिजन चॅनेलच्या कार्यालयाबाहेर पडताना पत्रकार आणि अँकर इम्तियाज मीर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हत्येच्या आरोपात चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या संशयितांची ओळख अजलाल जैदी, शहाब असगर, अहसान अब्बास आणि फराज अहमद अशी पटली असून ते ‘लष्कर सरुल्लाह’ या संघटनेशी संबंधित आहेत, जी प्रतिबंधित ‘जैनबियून ब्रिगेड’ चा एक भाग आहे.
गृह मंत्री जियाउल हसन लंजहार यांनी सोमवारी (दि.२७) दावा केला की, हल्लेखोरांना पत्रकार मीर हे इस्रायलचे कथित समर्थक वाटत होते, आणि त्यांच्या त्या समर्थनात्मक वक्तव्यामुळेच त्यांना लक्ष्य बनवण्यात आले.
सिंध पोलिसांचे महानिरीक्षक गुलाम नबी मेमन आणि कराची पोलिस आयुक्त जावेद आलम ओधो यांनी माध्यमांना सांगितले की, अटक केलेल्या चारही संशयितांनी पाकिस्तानाबाहेर असलेल्या आपल्या ‘आक्यांच्या’ (आदेश देणाऱ्या नेत्यांच्या) सूचनेवर ही हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांनी कोणत्याही देशाचे नाव न घेता सांगितले की, “अटक केलेले संशयित हे शिक्षित व्यक्ती आहेत आणि त्यांचा मुख्य नेता एका शेजारी देशात राहतो.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode