
नैरोबी, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।केनियाच्या किनारी भागातील क्वाले येथे मंगळवारी सकाळी एक छोटे विमान कोसळले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान मासाई मारा राष्ट्रीय अभयारण्यातील एका प्रसिद्ध पर्यटनस्थळाकडे जात होते. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की हा अपघात डायनी एअरस्ट्रीपपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर, डोंगराळ आणि जंगलयुक्त भागात झाला. या विमानात १२ प्रवासी प्रवास करत होते. अधिकाऱ्यांच्या मते, या अपघातात कोणाच्याही वाचण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. क्वाले काउंटीचे आयुक्त स्टीफन ओरिंडे यांनी सांगितले की, “ज्या ठिकाणी विमान अपघातग्रस्त झाले आहे, त्या ठिकाणी बचाव मोहीम सुरू आहे. सध्या अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode