
पाटणा, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीने आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्याचे नाव ‘बिहार का तेजस्वी प्रण’ असे ठेवण्यात आले असून त्यामध्ये राजद नेते तेजस्वी यादव यांच्या 20 प्रतिज्ञांचा समावेश आहे.
जाहीरनाम्यातील सर्वात मोठी घोषणा म्हणजे प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन. तेजस्वी यादव यांनी नमूद केले आहे की, 20 महिन्यांच्या आत या नोकऱ्या दिल्या जातील आणि 20 दिवसांच्या आत यासंबंधी कायदा केला जाईल. तसेच जाहीरनाम्यात तरुण, महिला, कंत्राटी कामगार, माजी पेन्शनधारक, शेतकरी आणि गरीब कुटुंबांसाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. पत्रकार परिषदेत प्रकाशित करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये राहुल गांधींचा फोटो होता, मात्र तो तेजस्वी यादव यांच्या फोटोपेक्षा लहान होता.
तेजस्वी यादव म्हणाले की, “आम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहराही जाहीर केला आहे. आज आम्ही पुढील पाच वर्षांतील कामकाजाचे रूपरेषा सादर करणारे ‘तेजस्वी प्रण पत्र’ प्रसिद्ध करत आहोत. सर्वात मोठे आश्वासन म्हणजे प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देणे.”
तसेच, महिलांसाठी ‘माई-बहीण योजना’ अंतर्गत मासिक 2500 रुपये भत्ता, 200 युनिटपर्यंत मोफत वीज, आणि 500 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याच्या योजनांचाही समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी