
जयपूर, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।राजस्थानच्या जयपूरमध्ये पुन्हा एकदा मोठा बस अपघात घडला आहे. जयपूरमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी बसला अचानक आग लागली. हा भयानक अपघात हाय-टेंशन वीजवाहिनीला बस लागल्यामुळे झाला. या भीषण घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर सुमारे 12 मजूर गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात जयपूर शहरापासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर मनोहरपूर परिसरात झाला. बसमध्ये ५ ते ६ गॅस सिलिंडर ठेवलेले होते. आग लागल्यानंतर या सिलिंडरमध्ये स्फोट झाले, ज्यामुळे बस पूर्णपणे जळून खाक झाली. या अपघातात मृतांचा आणि गंभीर जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच मनोहरपूर पोलिस ठाण्याची टीम आणि प्रशासकीय अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले, आणि जखमींना उपचारासाठी विविध रुग्णालयांत हलवण्यात आले आहे.अग्निशमन विभागाच्या पथकाने आग नियंत्रणात आणली. पोलिसांनी मृतांच्या मृतदेहांना शवविच्छेदनासाठी मोर्चरीत ठेवले असून, घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे.
रिपोर्टनुसार, ही बस शाहपूरा येथील टोडी गावाजवळील विटभट्टीवरून मजुरांना घेऊन येत होती. बसचालकाला रस्त्याच्या उंचीचा आणि वरून जाणाऱ्या वीजवाहिनीचा अंदाज नव्हता, ज्यामुळे बस हाय-टेंशन वीजवाहिनीला स्पर्श झाली त्यानंतर संपूर्ण बसमध्ये विद्युत प्रवाह पसरला आणि आग लागली.
या अपघातावर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शोक व्यक्त केला आहे. एक्स पोस्टद्वारे सीएम भजनलाल शर्मा म्हणाले, “जयपूरच्या मनोहरपूर येथे झालेल्या बस दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे. संबंधित अधिकाऱ्यांना जखमींना योग्य उपचार मिळावेत, यासाठी निर्देश दिले आहेत. प्रभूचरणी प्रार्थना करतो की दिवंगत आत्म्यांना आपल्या चरणी स्थान मिळो आणि जखमींना लवकरात लवकर आरोग्य लाभो.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode