‘मोंथा’ चक्रीवादळ : आंध्र, पं.बंगाल व ओडिशाला सतर्कतेचा इशारा
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेलं ‘मोंथा’ चक्रीवादळ गंभीर रूप धारण करत असून आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) माहितीनुसार
चक्रीवादळ लोगो


नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेलं ‘मोंथा’ चक्रीवादळ गंभीर रूप धारण करत असून आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) माहितीनुसार, गेल्या 6 तासांत हे चक्रीवादळ सुमारे 15 किमी प्रतितास वेगाने उत्तर-उत्तरपश्चिम दिशेने सरकत तीव्र होत चालले आहे.

‘मोंथा’ हे चक्रीवादळ मंगळवारी पहाटे 5.30 वाजता मच्छलिपट्टणमपासून 190 किमी दक्षिण-पूर्व, काकीनाडापासून 270 किमी दक्षिण-दक्षिणपूर्व आणि विशाखापट्टणमपासून 340 किमी दक्षिण-दक्षिणपूर्व अंतरावर केंद्रित होते. हवामान खात्याचा अंदाज आहे की, हे वादळ मंगळवारी रात्रीपर्यंत काकीनाडा परिसरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडक देईल, ज्यावेळी वाऱ्याचा वेग 90 ते 100 किमी प्रतितास, तर काही ठिकाणी 110 किमी प्रतितासांपर्यंत पोहोचू शकतो. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश प्रशासनाने उच्च सतर्कता जाहीर केली असून, बचाव पथके (एनडीआरएफ) सज्ज ठेवण्यात आली आहेत. प्रभावित किनारी भागांतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे.काकीनाडा शहरात जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे; एनडीआरएफ पथके सतत गस्त घालत असून लोकांना सुरक्षिततेच्या सूचना देत आहेत.

ओडिशामध्येही चक्रीवादळाचा परिणाम दिसू लागला आहे. खोरधा जिल्ह्यातील चिल्का सरोवरात पाण्याची पातळी वाढून उंच लाटा उसळत आहेत. पुरी येथे लाइफगार्ड आणि अग्निशमन दलाने पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याजवळ जाण्यास मनाई केली आहे. गंजाम जिल्हा प्रशासनाने आंध्र प्रदेशातील 100 हून अधिक मच्छिमारांना आश्रय दिला आहे. हे मच्छिमार त्यांच्या 28 बोटींसह समुद्रात अडकले होते आणि त्यांनी गोपालपूर बंदरात आसरा घेतला आहे. स्थिती सामान्य झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ गावात परत पाठविण्यात येईल.दरम्यान, पश्चिम बंगालच्या अनेक जिल्ह्यांत मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याने मच्छिमारांना गुरुवारपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.‘मोंथा’ चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे किनारपट्टी भागात दहशतीचे वातावरण असून, प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande